प्राप्तिकर विभागाकडून ‘गोकुळ’ची चौकशी

प्राप्तिकर विभागाकडून ‘गोकुळ’ची चौकशी

कोल्हापूर - प्राप्तिकराची रक्कम कमी-जास्त भरल्याने आज सायंकाळी जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकुळ) प्राप्तिकर विभागाने चार तासांहून अधिक काळ चौकशी केली. चौकशीसाठी दुपारी चारला एका महिला अधिकाऱ्यांसह पाच जणांचे पथक संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात आले होते. हा नियमित तपासणीचा भाग असल्याचे ‘गोकुळ’च्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, ‘गोकुळ’साठी दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोधारकांची माहिती उद्या (ता. ६)पर्यंत देण्याची सूचनाही या पथकाने केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 

‘गोकुळ’ला दर महिन्याला प्राप्तिकराची रक्‍कम भरावी लागते. एका महिन्यात ही रक्कम कमी-जास्त प्रमाणात भरली जाते. या पूर्वी ६ कोटी रुपये भरल्याची माहिती मिळत आहे; मात्र गेल्या महिन्यात सुमारे पाच कोटी रुपये कमी भरल्याचे समजते. त्यामुळे प्राप्तिकर विभागाने आज सायंकाळी चार वाजता संघाच्या कार्यालयाला भेट दिली. संघातून विक्री केलेला माल, प्रत्यक्ष उत्पादन, माल कोणाला विकला, त्यातून किती नफा मिळाला यासंदर्भातील कागदपत्रे या पथकाने तपासली.

या वेळी संघाच्या कार्यकारी संचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चार्टर्ड अकौंटंटही उपस्थित होते. चौकशी पूर्ण होईपर्यंत संघाच्या आस्थापना, अकौंटंट विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही थांबवून ठेवले होते. याच वेळी दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोधारकांची माहिती देण्याच्या सूचनाही या पथकानेही दिल्या.

त्यानुसार टेम्पोधारकांची संख्या आणि त्यांची नावे, बॅंक खाती यांबाबतची सर्व माहिती एकत्रित करण्याचे काम रात्री सुरू होते. सुमारे चार तासांच्या चौकशीनंतर संघाने पाच कोटी रुपये प्राप्तिकर कमी भरल्याचे आढळून आल्याचे समजते. एवढी रक्कम भरावी अशी नोटीसही संघाला दिल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, संघाच्या गोकुळ शिरगाव कार्यालयात अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा पडल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली. मात्र, माहिती घेतली असता प्राप्तिकर विभागाची ही नियमित तपासणी असल्याचे ‘गोकुळ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com