‘गोकुळ’ संपर्क सभेत हाणामारी

‘गोकुळ’ संपर्क सभेत हाणामारी

कोल्हापूर - ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याचा ठराव इंग्रजीत का छापला, असा जाब राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील गटाचे विश्‍वास नेजदार यांनी केला. यावर काहीजणांनी नेजदार यांच्यावर खुर्च्या भिरकावत मारहाण केली. त्यामुळे ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात झालेल्या करवीर तालुका संपर्क सभेत गोंधळ उडाला. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 

जिल्हा दूध संघाची (गोकुळ) वार्षिक सभा शुक्रवारी (ता. २१) होत आहे. यानिमित्त ‘गोकुळ’ मल्टिस्टेटसह सभासदांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संचालक मंडळ तालुका संपर्क दौरा करत आहे. आज करवीर तालुका संपर्क सभा ‘गोकुळ’च्या कार्यालयात होती. सभा सुरू होत असताना विरोधी गटाचे संस्था प्रतिनिधी मागे उभे होते. ‘गोकुळ’चे अध्यक्ष पाटील यांनी त्यांना पुढे येण्यास सांगितले. संस्था प्रतिनिधी बसण्याआधीच तालुक्‍यातील प्रतिनिधींनीच सभागृह भरून गेले आहे.

बसण्यासाठी जागा कुठे आहे, असा सवाल किरणसिंह पाटील 
यांनी केला व ते कार्यकर्त्यांसह व्यासपीठासमोर आले. जागा असतानाही तुम्ही जाणीवपूर्वक बसत नसल्याची टीका पाटील यांनी केली. याचवेळी दोन्ही समर्थकांच्या वादाला सुरुवात झाली. सभागृह हाऊसफुल्ल झाले असताना, जागा आहे म्हणून पाटील कसे काय सांगतात? असा जोरदार सवाल केला जाऊ लागला. यातूनच एकमेकांना धक्काबुक्की होत राहिली आणि वातावरण तणावपूर्ण झाले. दहा ते पंधरा मिनिटे गोंधळ सुरूच राहिला. त्याचवेळी पाटील यांनी प्रास्ताविक केले. 

अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘काही मंडळी मला इंग्रजी वाचता येते का बघत आहेत; पण वसंतदादा पाटील सातवी पास होते. तरीही ते मुख्यमंत्री झाले. येथे शिक्षणाबाबत काहीही सांगू नका. गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा विषय सर्वसाधारण सभेपुढचा आहे. तेथेच त्याची चर्चा केली जाईल.’’ याला जोरदार विरोध करत बाबासाहेब चौगले म्हणाले, ‘‘गोकुळ मल्टिस्टेट पोटनियम दुरुस्तीचा मजकूर इंग्रजीत का छापला? संस्था प्रतिनिधी किंवा सभासदांना याची माहिती कशी मिळणार? केवळ आम्ही टीका केल्यानंतर तो मजकूर मराठीत छापला.’’

विश्‍वास नेजदार म्हणाले, ‘‘आम्ही प्रश्‍न विचारला की कोणतरी गोंधळ घालत आहे. हे चुकीचे आहे.’’ वसंतदादा पाटील यांच्यासारखे नेते कोटीत एखादे होतात आणि वसंतदादा म्हणजे तुम्ही नव्हे, अशी टिपणीही नेजदार यांनी केली. यावर सभागृहात जोरदार टाळ्या होऊन हशा पिकला. त्यामुळे काही जण नेजदार यांच्या अंगावर धावून गेले. त्यातून झटापट आणि हाणामारी सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. नेजदार यांच्या दिशेने दोन ते तीन खुर्च्या भिरकावल्या गेल्या. नेजदार यांच्या डोक्‍यात खुर्ची लागली. त्यामुळे गोंधळ वाढला.

अचानक गोंधळ
व्यासपीठाच्या उजव्या बाजूला काहीजण उभे होते. दरम्यान, नेजदार आपले मत मांडत असताना उजव्या कोपऱ्यातील काही तरुण आले आणि त्यांच्या अंगावर धावून जाऊन खुर्च्यांची फेकाफेकी सुरू झाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com