‘गोकुळ’चे संकलन १.७७ लाख लिटरने घटले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे नद्यांना आलेल्या महापुराचा फटका कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) दूध संकलनाला बसला आहे. आज एका दिवसात सकाळच्या सत्रात ९० हजार लिटर दूध संकलन घटले आहे. ३० जुलैपासून आजपर्यंत सुमारे १ लाख ७७ हजार लिटर दूध संकलन घटले.

कोल्हापूर - जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे नद्यांना आलेल्या महापुराचा फटका कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) दूध संकलनाला बसला आहे. आज एका दिवसात सकाळच्या सत्रात ९० हजार लिटर दूध संकलन घटले आहे. ३० जुलैपासून आजपर्यंत सुमारे १ लाख ७७ हजार लिटर दूध संकलन घटले. गोकुळसह वारणा व इतर संघांच्या संकलनातही घट झाली असून त्याचा सुमारे एक कोटी रुपयांचा फटका उत्पादकांना बसला आहे.  आज सायंकाळचे किमान ७० हजार लिटर दूध संकलन घटण्याची शक्‍यता आहे.

‘गोकुळ’कडे जिल्ह्यासह कर्नाटकाचे मिळून एकूण ४५० मार्गावरून दूध संकलन केले जाते. गेल्या आठ दिवसांपासून धुवाँधार पावसाने  जिल्ह्यातील पंचगंगेसह सर्वच नद्यांना महापूर आला असून अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. ५३ मार्गांवरील संकलन पूर्णपणे बंद आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी बंद असलेल्या मार्गाला असलेले पर्यायी मार्गही बंद झाले. त्याचा फटका दूध संकलनाला बसला आहे. आज सकाळच्या सत्रातील ९० हजार लिटर दूध ‘गोकुळ’कडे आलेच नाही. यात ४६ हजार ५६७ लिटर दूध म्हशीचे, तर ४३ हजार ५८३ लिटर दूध गायीचे आहे.  

पन्हाळा, गगनबावडा तालुक्‍यातील २२ रुटवरील १८ हजार १७० लिटर म्हैस, तर १२ हजार ८०६ लिटर गाय दूध आले नाही. त्याचबरोबर करवीर पश्‍चिम, करवीर पूर्व, शिरोळ, कुडित्रे, तावरेवाडी (चंदगड), शाहूवाडी तालुक्‍यातील गोगवे शीतकरण केंद्राकडेही दूध संकलन घटले आहे. ३० जुलैपासून दूध संकलनात सातत्याने घट होत आहे. ३० जुलै ते ४ ऑगस्ट या काळात सुमारे ८७ हजार ८५२ लिटर दूध संघाकडे आलेच नाही. ‘गोकुळ’बरोबरच वारणा व इतर खासगी संघाच्या दूध संकलनातही मोठी घट झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gokul Milk 1.77 Lakh Liter Collection Less