गोकुळ 'मल्टिस्टेट'वरुन कलगीतुरा

गोकुळ 'मल्टिस्टेट'वरुन कलगीतुरा

सतेज पाटलांना पैशाची कावीळ - महाडिक

‘गोकुळच्या टॅंकर भाड्याची चौकशी करा, असे म्हणणाऱ्या आमदार सतेज पाटील यांना पैशाची कावीळ झाली आहे,’ असा टोला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी लगावला. राजाराम सहकारी साखर कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

महाडिक म्हणाले, ‘‘गोकुळच्या २०० गाड्या फिरतात. दहा वर्षांत मुंबई, पुणे या मार्गावर गाड्या धावल्यावरच पैसे मिळतात. मात्र काही लोकांना सर्वच गोष्टीत पैसा दिसतो. म्हणूनच त्यांनी थेट पाईपलाईनमध्ये १५० कोटी रुपयांसह आयआरबीमध्ये किती पैसे घेतले?’’

आज शेती महामंडळाची कसबा बावडा, चिखली, रुकडी, निगवे येथे असणारी सुमारे ४५० एकर जमीन पाटील यांच्याकडे आहे. त्यांनी हेक्‍टरी पाच हजार रुपये शासनाला दिले आहेत. शेतकऱ्यांकडून मात्र ते एकरी १५ टन ऊस घेतात. म्हणजेच एकरामागे ४५ हजार रुपये त्यांच्याकडे जात आहेत. अशाप्रकारे शासनाच्या जमिनी लाटणाऱ्यांना महाडिकांवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही.

गगनबावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे ६७०० सभासद होते. एका रात्रीत त्यातील ४२६० सभासद कमी केले असून, आता  केवळ २२१२ सभासद राहिले आहेत. गेल्या १५ वर्षांत या कारखान्याचा वार्षिक अहवाल खुद्द अध्यक्षालाही मिळालेला नाही. या कारखान्याची अशा पद्धतीने खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याची टीका महाडिक यांनी केली. 

‘गोकुळ’चा वाटा सर्वांना दिला - विलास कांबळे
गोकुळ दूध संघाच्या नोकरभरतीत ज्या जागा मिळाल्या होत्या, त्यातील वाटा आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांना दिल्याचे राष्ट्रवादीच्या कोट्यातून ‘गोकुळ’चे संचालक झालेल्या विलास कांबळे यांनी यावेळी सांगितले.

जाब विचारण्यास गेलो होतो
बावड्यात मी सतेज पाटील यांना जाब विचारण्यासाठी गेलो होतो. तर नेजदार हे कारखान्याचे चेअरमन होते. त्यामुळे त्यांच्याबाबत झालेला प्रकार योग्य नसल्याचे सांगण्यासाठी गेलो होतो, माफी मागण्यासाठी नाही, असे महाडिक यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, माफीनामा शब्द महाडिकांच्या डिक्‍शनरीत नाही. महाडिकांनी आयुष्यात कधीच कोणाची माफी मागितलेली नाही. महाडिकांनी माफी मागितली असे जर बावड्यातील लोकांनी सांगितले तर मी स्वत: बावड्यात येणे बंद करेन.

हिंमत असेल तर व्यासपीठावर या
गोकुळच्या मल्टिस्टेटवरून वाद सुरू आहे. या विषयावर न बोलता महाडिक या विषयावर चर्चा केली जात आहे, हे योग्य नाही. संघाच्या दृष्टीने घातक आहे. जर आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी व्यासपीठावर चर्चेसाठी यावे, असे खुले आव्हानच महाडिक यांनी दिले.

 महादेवराव महाडिक सैरभैर झालेत - सतेज पाटील

कोल्हापूर येथे ३७ वर्षांपूर्वी आलेला आणि कावळा नाक्‍यावर रॉकेल-पेट्रोलचा व्यवसाय करणारा परजिल्ह्यातील महाडिक नावाचा माणूस करोडपती कसा झाला, हे कोल्हापुरातील स्वाभिमानी जनतेला माहीत आहे.

‘गोकुळ’चे लोणी व मलई लाटून गब्बर झालेल्या महाडिकांनी या दूध संघाला स्वत:च्या व्यवसायाचे स्वरूप दिले. त्यांची प्रगती ही पेट्रोल भेसळ आणि दूध संस्थेतील मलईवर झाली आहे, असे पत्रक आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

दरम्यान, हाच मुख्य व्यवसाय असल्याने त्यांचा जीव ‘गोकुळ’मध्ये अडकला आहे; पण गोकुळ मल्टिस्टेट विरोधात आम्ही सुरू केलेला लढा आणि या लढ्याला जिल्ह्यातील स्वाभिमानी दूध उत्पादकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून महाडिक सैरभैर झाले आहेत. मल्टिस्टेटच्या या विषयाकडून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ते माझ्यावर बेताल आरोप करत आहेत. त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. संघाच्या वार्षिक सभेला आम्ही येत असून हिम्मत असेल तर महाडिकांनी आमच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असेही पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात म्हटले आहे, की आपला व्यवसाय बुडेल, या भीतीपोटी महाडिक या विरोधाला न जुमानता काहीही झाले तरी ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करणारच, अशी हुकूमशाहीची भाषा बोलत आहेत. त्यांची ही भाषा म्हणजे जिल्ह्यातील स्वाभिमानी दूध उत्पादकांना दिलेले आव्हान आहे; पण कोल्हापूरची स्वाभिमानी जनता चॅलेंज करणाऱ्यांना झटका दिल्याशिवाय राहत नाही, हे महाडिकांनी विसरू नये.

‘गोकुळ’च्या ३१० कोटींच्या टॅंकर भाड्याबद्दल मी ऑडिट रिपोर्टमधील पुराव्यानिशी बोललो आहे; पण ते मात्र कोणताही पुरावा नसताना केवळ डायलॉगबाजी करत सुटले आहेत. आयआरबी, थेट पाईपलाईन, वॉटर पार्क तसेच शेती महामंडळ जमीन याबाबत माझ्यावर केलेले आरोप त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावेत, असे त्यांना जाहीर आव्हान आहे.

पुणे येथील ‘गोकुळ’ची एजन्सी कोणाकडे आहे ? पेट्रोलमधील नाफ्ता भेसळ प्रकरणातील राजन शिंदेशी महाडिकांचा काय संबंध आहे का? हेही त्यांनी सांगितलेले नाही, असेही पत्रकात म्हटले आहे. 

हे जनतेला चांगलेच ठाऊक
न्यू शाहूपुरीत २६ फेबुवारी १९७९ ला रात्री न्यू शाहूपुरीतील माधवराव रामचंद्र महाडिक यांच्या घरातील मटका जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला होता. हे महाडिक नेमके कोण, हे कोल्हापुरातील जनतेला माहीत आहे. 

गोकुळमधील टॅंकर कोणाच्या मालकीचे?
गोकुळमधील टॅंकर कोणाच्या मालकीचे? या माझ्या प्रश्‍नाचे आजवर उत्तर न देणाऱ्या महाडिकांनी ‘गोकुळ’मध्ये माझे ४० टॅंकर आहेत, याची कबुली दिली आहे. या दूध संस्थेतील कोल्हापूर आईस फॅक्‍टरी कोणाची? याचे उत्तरही त्यांनी आजपर्यंत दिलेले नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com