गोकुळ मल्टिस्टेट ८ महिन्यांत होणार

गोकुळ मल्टिस्टेट ८ महिन्यांत होणार

कोल्हापूर - विरोधकांना न जुमानता जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्यात संघाची नेतेमंडळी यशस्वी झाली आहेत. मात्र मल्टिस्टेटची ही लढाई साधी सोपी राहिलेली नाही. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. ‘गोकुळ’ मल्टिस्टेट होण्यासाठी किमान आठ महिन्यांचा कालावधी लागेल, असा अंदाज आहे. या कालावधीत विरोधक किती ताकदीने पुरावे सादर करतात, युक्‍तिवाद-त्रुटी दाखवतात, तसेच त्या ग्राह्य धरल्या जातात, यावरच मल्टिस्टेटचे भवितव्य अवलंबून आहे.

राज्यासह देशातील व आशियात अग्रेसर असलेला जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट करण्यावरून सर्वसाधारण सभेत राडा झाला. खरं तर गेले अडीच महिने गोकुळ मल्टिस्टेटवरून रान पेटले होते. नेत्यांकडून अगदी खालच्या पातळीवर टीकाटिप्पणी झाली. त्यामुळे वार्षिक सभेत गोंधळ होणार, हे निश्‍चित होते. मात्र, गृहीत धरल्यापेक्षा कितीतरी मोठा गोंधळ आणि राडा गोकुळच्या सर्वसाधारण सभेत झाला. तरीही सत्ताधाऱ्यांनी मल्टिस्टेटचा ठराव मांडून मंजूर केला. 

या ठरावाच्या विरोधात विरोधकांची कायदेशीर लढाईची तयारी सुरू आहे. मात्र, ठराव झाला तरी तो केंद्र, राज्य शासनाच्या सहकार व दुग्ध विकास विभागाकडे जाणार आहे. त्यांची मोहर उठण्यासाठी किमान आठ महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज बांधला जात आहे.  

राज्यातील विविध प्रकारच्या सुमारे ९०० संस्था मल्टिस्टेट झाल्या आहेत. या संस्थांची माहिती संघाकडून घेण्यात आली. त्यानंतरच मल्टिस्टेटचा ठराव पुढे करण्यात आला. संघाकडून ठराव मंजूर झाल्यानंतर तो केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी जाणार आहे. यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी जाणार आहे. केंद्र शासनाकडून हा प्रस्ताव राज्य शासनाकडे येणार आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून तो दुग्ध विकास विभागाच्या आयुक्‍तांकडे जाणार असून, त्यांचीच मल्टिस्टेटवर मोहर उठवली जाणार आहे. 

तसेच मल्टिस्टेटचा एक ठराव कर्नाटक शासनाकडे जाणार आहे. कर्नाटक शासनाची नंदिणी ही शासकीय दूध डेअरी आहे. त्या संघाचीही ना हरकत घेऊन कर्नाटकमधील प्रवास सुरू होणार आहे.

ना हरकत मिळू नये, यासाठी हालचाली
‘गोकुळ’मधील विरोधकांनी मल्टिस्टेट ठरावाला कडाडून विरोध केला. त्याबाबतचे पुरावे संकलन करण्यात आले आहेत. तसेच संघातील जी अनियमितता आहे, त्याची नोंद लेखापरीक्षणात आली आहे. या सर्व बाबी न्यायालयात सादर केल्या जाणार आहेत. या सर्व पुराव्यांच्या आधारे मल्टिस्टेटचा ठराव चुकीच्या पद्धतीने झाल्याचे सिद्ध करण्यासाठी विरोधक प्रयत्न करणार आहेत. तसेच आजपर्यंत राज्य शासनाने गोकुळ दूध संघाला मोठी मदत केली आहे. ती मदत पाहता या संघाला मल्टिस्टेट करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, अशी भूमिका विरोधकांकडून घेतली जाणार आहे.

‘भारतात कोणत्याही न्यायालयात जा’ - महाडिक

जिल्हा दूध संघाची (गोकुळ) ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत चालू असताना विरोधकांनी ११ वाजून १ मिनिटांनी सभागृहात गोंधळ घातला. वरून विरोधक न्यायालयात जाण्याची भाषा करत आहेत. ही लोकशाही आहे. त्यांना भारताच्या कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. मात्र या न्यायालयात निकाल मात्र ‘गोकुळ’च्याच बाजूने लागेल, असा टोला गोकुळचे नेते महादेवराव महाडिक यांनी लावला.

गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्यात साडेपाच लाख दूध उत्पादक माता-भगिनींचा आशीर्वाद आहे. त्यामुळेच संघ मल्टिस्टेट झाला आहे. विरोधकांच्या सर्व प्रश्‍नांना उत्तरे देण्याची तयारी आम्ही केली होती. मात्र विरोधकांकडे ठरावच नसल्याने त्यांना सभाच चालवायची नव्हती. आमच्याकडे ३५५९ पैकी ३००० ठरावधारक होते. त्यामुळे त्यांचा टिकाव लागणार नव्हता. म्हणूनच त्यांनी रडीचा डाव खेळत गोकुळचे गेट मोडून प्रवेश केला. तसेच सभा उधळून लावण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप महाडिक यांनी केला. 

गोकुळ मल्टिस्टेट केला आहे, तो सभासदांच्या फायद्यासाठीच. भविष्यात गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकाला जादा परतावा देण्याचा संकल्प आहे. यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे. 
गोकुळच्या दुधाला बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळेच मल्टिस्टेट करून उत्पादकाचे हित साधणार आहे. मात्र, सभासदांच्या हिताआड काही मंडळी येत आहे. त्यांना गोकुळ अथवा संघाच्या हितापेक्षा स्वत:चे हित महत्त्वाचे वाटत आहे. मात्र, संघाचे मालक असलेले सभासद, उत्पादक हे चालू देणार नाहीत, असा विश्‍वास महाडिक यांनी व्यक्‍त केला.

‘सभा पुन्हा घेण्यासाठी दाद मागणार’ - सतेज पाटील

जिल्हा दूध संघाची (गोकुळ) रविवारी (ता. ३०) झालेली ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नियमानुसार नाही, ती पुन्हा घ्यावी, अशी मागणी सहकार खात्याकडे करणार आहे. तसेच न्यायालयीन लढासुद्धा सुरूच राहणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

जिल्हा दूध संघाच्या सभेत ठराव वाचले गेले नाहीत. केवळ क्रमांक जाहीर करण्यात आले. यावेळी मंजूर-नामंजूर असा सूर सभागृहात उमटला. अवघ्या तीन मिनिटांत सभा गुंडाळण्यात आली. ही सभा लोकशाही मार्गाने, तसेच सहकार खात्याच्या नियमानुसार झालेली नाही. ती पुन्हा घेता येते, असे सहकारातील अभ्यासकांचे मत आहे. त्यानुसार आम्ही ‘गोकुळ’ बचाव समितीच्या वतीने आमदार-खासदारांच्या सह्या घेऊन सहकार खात्याला पत्र देणार आहे. सभा पुन्हा घ्यावी, अशी मागणी आम्ही करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘‘जे विषय सभेत वाचलेच गेले नाहीत, ते विषय मंजूर कसे होऊ शकतात. सभा नियमात झाली नसली तर ती पुन्हा घेता येते. त्यामुळेच आम्ही सभा पुन्हा घ्यावी, अशी मागणी करणार आहोत. याचबरोबर न्यायालयात सुद्धा याबाबत दाद मागणार आहोत. लोकशाही पद्धतीने सभा घेणे आवश्‍यक असतानाही ती झालेली नाही. केवळ तीन मिनिटांत सभा संपवली आहे. सभा कशी बेकायदेशीर झाली आहे, त्याची माहिती आम्ही न्यायालयात देणार आहोत, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com