दुधाच्या दरासाठी प्रतिष्ठा पणाला लावा

दुधाच्या दरासाठी प्रतिष्ठा पणाला लावा

कोल्हापूर - जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळ मल्टिस्टेट करावा यासाठी आणि होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांसह आमदार, खासदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली. हीच प्रतिष्ठा गाईच्या आणि म्हशीच्या दुधाला जादा दर मिळवून देण्यासाठी लावली असती, तर जिल्ह्यातील साडेसहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे कल्याण झाले असते, असे स्पष्ट मत ‘सकाळ’ सोबत बोलताना दूध उत्पादकांनी व्यक्त केले.

पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील दूध उत्पादक शेतकरी तानाजी अशोक पाटील यांची अगदी सकाळी भेट घेतली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘पहाटे पाच ते रात्री नऊपर्यंत जनावरांची उसाभर करावी लागते. माझ्याकडे दोन दुभत्या म्हशी आहेत. एक रेडी आहे. दोन म्हशी दिवसा आणि रात्री मिळून १४ लिटर दूध देतात. या दुधाला सहा फॅट लागते. त्यासाठी प्रतिलिटर ३९ रुपये दर मिळतो. दुधाचे दहा दिवसांचे ५००० ते ५५०० रुपये मिळतात. दहा दिवसांत होणाऱ्या बिलातील भुस्सा, गोळी,  सरकी पेंड व कोंडा, असे महिन्याला दहा पोती खाद्य लागते. यासाठी सुमारे २२०० ते २५०० रुपये कपात केली जाते. राहिलेले २५०० ते ३००० रुपयेच हातात मिळतात. पहाटे ५ पासून रात्री ९ पर्यंत जनावरांची देखभाल करण्यातच दिवस जातो. यामध्ये माझे वडील अशोक पाटील, आई प्रभावती आणि मी असे तिघे राबतो; पण खर्च जाऊन हातात मिळणारी रक्कम पाहिली तर सगळा आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे.

एवढ्या महागाईत प्रपंच कसा चालवायचा, असा प्रश्‍न वारंवार भेडसावतो. माझ्या वडिलांनी दूध व्यवसाय केला म्हणून मी करतोय; पण मी करतोय म्हणून माझ्या मुलाला या व्यवसायात पडू देणार नाही; पण आमचे जीवन सुखकर होण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी ‘गोकुळ मल्टिस्टेट’ होण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी जेवढी प्रतिष्ठा आणि ताकद पणाला लावली. तेवढी ताकद दूध दर मिळवून देण्यासाठी लावली तर निश्‍चितपणे शेतकऱ्यांचा फायदा होईल.’’

दूध उत्पादनाचे गणित
दोन म्हशी आणि एका रेडीसाठी महिन्याला विविध प्रकारचे दहा पोती खाद्य द्यावे लागते. दिवसाला सुमारे दहा किलो खाद्य द्यावे लागते. पावणे दोनशे रुपये प्रतिदिन खर्च करावा लागतो. त्याचाच हा खर्च.

खाद्य प्रकार * पोत्याचा दर*   दिवसाचे खाद्य*  खर्च (रुपयात) 
भुस्सा*     ८००*   ४ किलो*                    ६४ 
गोळी*   ९५५*              ४ किलो*                    ७६
सरकी पेंड*      ९४०*            १ किलो*                    २३
कोंडा*        ५००*                १ किलो*                     १०
 

संस्था मोठ्या झाल्या, शेतकरी तेथेच
दिवस-रात्र राबून दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवावर कौलारू आणि भाड्याच्या घरात सुरू असणाऱ्या दूध संस्थांच्या मोठमोठ्या इमारती झाल्या. याच संस्थांकडून दूध स्वीकारणाऱ्या गोकुळ दूध संघावर सोन्याच्या खापऱ्या बसल्या आणि संचालक गब्बर झाले; पण जनावरांचे शेण-घाण काढून आणि पोटाला चिमटा देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान मात्र काही सुधारले नाही, अशी खंत करवीर तालुक्‍यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दुधाला चांगला दर मिळाल्याशिवाय हा व्यवसाय परवडणार नाही. दोन महिन्यांपासून दूध दर कमी होत आहे आणि खर्च वाढत आहे. याचा विचार करून दूध दर वाढवला पाहिजे. गोकुळ मल्टिस्टेट म्हणजे काय हे माहिती नाही; पण दुधाला दर मिळाला पाहिजे, एवढे मात्र मला माहिती आहे. दूध व्यवसायावर आमचे पाच जणांचे कुटुंब चालते. पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजेत. त्यामुळे मिळणारे पैसे हे पशुखाद्यालाच द्यावे लागतात. खर्च वजा जाता हातात काहीच पडत नाही. दूध दर वाढ करून खाद्याचे दर कमी करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करावेत.
-वैजयंती मोहन शेलार
, वडणगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com