गोकुळमध्ये सभेच्या ठिकाणी सभासदांना सोडण्यास सुरुवात

गोकुळमध्ये सभेच्या ठिकाणी सभासदांना सोडण्यास सुरुवात

कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सकाळी पावणे सातपासून सभासदांना सभेच्या ठिकाणी सोडण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत किमान 60 टक्के सभागृह भरलेलं आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आणि प्रवेशद्वारापासून आत आल्यानंतर आलेले ठराव स्कॅनिंग करण्याचे काम किमान पाच संगणकावर सुरू आहे.

जिल्हा दूध संघ (गोकुळ) संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. ताराबाई पार्क येथील संघाच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात ही सभा सकाळी ११ वाजता होणार आहे.

संघ मल्टिस्टेट करण्याचा ठराव सभेत मांडला जाणार आहे. या ठरावावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची विरोधकांनी तयारी केली आहे. यावेळी वादळी चर्चा होण्यासह दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. म्हणूनच पोलिस प्रशासनाने गोकूळ सभेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. 

गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा ठराव कोणत्याही परिस्थितीत मंजूर करायचाच, यासाठी संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, खासदार धनंजय महाडिक आग्रही आहेत. हा ठराव मंजूर होऊ नये, यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके सक्रिय आहेत. मल्टिस्टेट मुद्‌द्‌यावरून महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी झाल्या आहेत. आमदार मुश्रीफ आणि महाडिक यांच्यात वाक्‌युद्धही झाले. महाडिकांनी थेट आमदार मुश्रीफ यांच्या कारभारावरच हल्लाबोल केल्याने जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले.

गोकुळ मल्टिस्टेट करण्याबाबत संस्था प्रतिनिधींचे गुप्त मतदान घ्यावे, सभा खुल्या मैदानात व्हावी, तसेच संघ मल्टिस्टेटच करता येत नाही, अशी याचिका विरोधी गटाने दाखल केली होती; मात्र न्यायालयाने ही याचिका निकालात काढली. ही न्यायालयीन लढाई पुढेदेखील सुरू राहणार आहे. दरम्यान, रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेवर दोन्ही गटांनी लक्ष केंद्रित केले आहे. सभेत येणारा ठराव, त्यावर होणारी चर्चा, सभासदांचा सूर, कारभाऱ्यांची भूमिका यावरून सभा गाजणार आहे, हे मात्र निश्‍चित.

दरम्यान, सभेसाठी कडेकोट बंदोबस्त देण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी सभासदांना सोडण्यासाठी एकच गेट करण्यात आले आहे. सभासदांना दिलेला बारकोड या ठिकाणी तपासूनच आत सोडण्यात येणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी पोलिस मैदानात व्यवस्था केली आहे. गोकुळच्या कर्मचाऱ्यांनाही पोलिस यंत्रणेच्या कडक व्यवस्थेतूनच जावे लागणार आहे. 

सभेत मल्टिस्टेटचा ठराव मांडणार आहे. विरोधाला विरोध न करता सर्वजण सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे गोकुळची ही सभा खेळीमेळीत पार पडेल. राज्यासह देशातील नावाजलेला हा संघ आहे. ज्यांना काही शंका असतील, प्रश्‍न असतील तर त्यांची संघाकडून उत्तरे दिली जातील.
- महादेवराव महाडिक,
गोकुळचे नेते.

ठरावावर चर्चा करावी
गोकुळ संघाकडून मल्टिस्टेटचा ठराव सर्वसाधारण सभेत ठेवला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कऱ्हाड व इतर बाहेरील ठिकाणांहून काही लोक आणून सभास्थळी बसवले जाणार आहेत. संघात लोकशाही असेल, तर आम्हाला सभेच्या ठिकाणी पुढे बसण्यासाठी जागा द्यावी, बोलण्यास माईक द्यावा व ठरावावर चर्चा करावी.
-सतेज पाटील,
आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com