सोलापुरातील सरड्यांच्या छायाचित्राला सुवर्णपदक 

परशुराम कोकणे 
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

सोलापूर : सोलापूर परिसरातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य शिवानंद हिरेमठ यांनी टिपलेल्या दोन सरड्यांच्या छायाचित्राला जागतिक पातळीवरील सुवर्णपदक मिळाले आहे. वन्यजीव सप्ताहात पर्यावरणप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

सोलापुरात निसर्ग संवर्धनासाठी कृतीशील असलेल्या नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या माध्यमातून वन्यजीवांची शिकार रोखण्यासाठी रानावनात भटकंती करताना हिरेमठ यांना वाइल्डलाइफ फोटोग्राफीचा छंद जडला. नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य असणारे हिरेमठ हे सिद्धेश्‍वर प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

हिरेमठ यांच्यासह वैभव वंजारी, भरत छेडा, राहुल वंजारी यांनी सोलापुरातील जवळपास 235 पक्ष्यांचे फोटो रेकॉर्डसहीत इत्थंभूत माहिती संकलित केली. ही माहिती इंडियन स्ट्रीम रिसर्च जनरलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या सहाव्या व्हिजन झिरो आंतरराष्ट्रीय सलूनमध्ये हिरेमठ यांनी टिपलेल्या सरड्यांचे द्वंद्व या फोटोला सुवर्णपदकासह प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.

तसेच रशियात झालेल्या वर्ल्ड इको फोटो स्पर्धेत नेचर कॅटेगरीमध्ये भारताला म्हणजेच सोलापुरातील सरड्याच्या द्वंद्व फोटोला पहिल्या क्रमांकाचे सुवर्णपदक मेडल मिळाले आहे. यामध्ये एकूण 80 देशातील फोटोग्राफर्सनी सहभाग घेतला होता. यात नेचर कॅटेगिरीमध्ये भारतातून सोलापूरचे रहिवासी  हिरेमठ यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या या फोटोमुळे सोलापुरातील सरड्याला जागतिक पातळीवर स्थान मिळाले आहे. या सन्मानामुळे सोलापूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेल्याचे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले. 

ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक भरत छेडा यांच्या पुढाकारातून 1992 साली नेचर कॉन्झर्वेशन सर्कल या पर्यावरणवादी संघटनेची स्थापना झाली. लोकांमध्ये निसर्गाविषयी जागृती निर्माण करणे आणि निसर्ग संवर्धनात लोकांचा सहभाग वाढविणे यावर नेचर कॉन्झर्वेशन सर्कलने योगदान दिले आहे. लोकवस्तीत आढळणाऱ्या सापासह इतर सर्वच वन्यजीवांना सुरक्षितरीत्या पकडून परत त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देण्याचे कार्य नेचर कॉन्झर्वेशन सर्कल करत आहे. 

मादी सरड्याला मिळविण्यासाठी दोन नर सरड्यांमध्ये सुरु असलेल्या द्वंद्वयुद्धावेळी हे छायाचित्र टिपले आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा दुर्मिळ क्षण आहे. दोन वर्षांपासून मी अशा छायाचित्राच्या प्रयत्नात होता. जैवविविधतेमध्ये सरड्याची भूमिका महत्त्वाची आहे. दोन स्पर्धांमध्ये या छायाचित्राला बक्षीस मिळाले आहे. 
- शिवानंद हिरेमठ, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold medal picture of Chameleon in Solapur