वाळूला सोन्याचा "भाव' 

तात्या लांडगे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सोलापूर - राज्यात सध्या वाळूचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. घरकुलासाठी शासनाकडून एक लाख 20 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. एका घरासाठी साधारणपणे दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च होतो. मात्र, वाळूला सोन्याचा दर (एका ट्रकसाठी 45-50 हजार रुपये) द्यावे लागत असल्यामुळे राज्यातील चार लाख 47 हजार 653 घरकूल लाभार्थ्यांची कामे ठप्प असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

राष्ट्रीय हरित लवादाच्या कडक निर्बंधामुळे राज्याचे महसूल विभाग वाळूच्या लिलावाबाबत गप्प आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परदेशातून वाळू आयात करून राज्यातील वाळू टंचाईवर मात करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, त्याबाबतही हालचाली थांबल्यामुळे राज्यातील बांधकाम व्यवसाय अडचणीत सापडला असून, मजुरांसमोरही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. सध्या वाळू, स्टिल, सिमेंटचे दर वाढल्याने सरकारच्या अनुदानात घर बांधणे सर्वसामान्यांना परवडेनासे झाले आहे. 2017-18 मधील राज्यातील सुमारे साडेचार लाख घरकुलांची कामे अपूर्ण आहेत. त्यामध्ये सोलापूर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, वाशीम, जालना, परभणी, हिंगोली, रायगड, पुणे, उस्मानाबाद, अहमदनगर, सांगली, औरंगाबाद, कोल्हापूर, अकोला आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

घरकूल बांधकामाचे अंदाजे बजेट  (रुपयांत) 
वाळू - 65 हजार 
सिमेंट - 19 हजार 
विटा - 56 हजार 
दरवाजे, प्लास्टर, फरशी - 20 हजार 
बांधकाम मजुरी - 65 हजार 
एकूण खर्च - 2 लाख 25 हजार 
शासन अनुदान - 1 लाख 20 हजार 

मागील वर्षापासून वाळूअभावी बांधकामाचे बजेट वाढल्याने व मुबलक प्रमाणात वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुलाची अनेक कामे खोळंबली आहेत. 
- अनिल नवाळे, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा 

Web Title: Gold price for sand