सोन्या-चांदीच्या राख्यांकडे बहिणींचा कल

सराफ पेढ्यांवर दाखल झालेल्या सोन्याच्या आकर्षक राख्या.
सराफ पेढ्यांवर दाखल झालेल्या सोन्याच्या आकर्षक राख्या.

सातारा - स्वातंत्र्यदिनादिवशीच यावर्षी रक्षाबंधन आल्याने तिरंगी काठ आणि तिरंगीच बुट्टीची नक्षी असलेल्या साड्यांना मागणी वाढली असून, पारंपरिक राख्यांबरोबरच रक्षाबंधनानंतर गळ्यात पेंडंट घालून भावाला मिरवता येईल, अशा सोन्या-चांदीच्या राख्या घेण्याकडे बहिणींचा कल वाढला आहे. त्यामुळे सध्या कापड दुकानांसह सराफपेढ्यांवरही गर्दी वाढू लागली आहे. 

स्वातंत्रदिनादिवशी पुरुष मंडळींचा कल पांढरा शुभ्र शर्ट, विजार, सलवार कुर्ते आणि गांधी टोपी घालण्याकडे जास्त असतो. पण, महिलांसाठी वस्त्रांतून देशभक्ती दृगोच्चर करण्याची तशी कोणतीच संधी फारशी मिळत नव्हती. मात्र, कापड दुकानदारांनी महिलांचीही १५ ऑगस्टची सोय केली आहे. यावर्षी खादीसह विविध प्रकारचे पांढरे शुभ्र तयार कपडे विक्रीस आणले आहेत.

त्याच बरोबर तिरंगी काठ आणि तिरंगी वेलबुट्टी असलेल्या पाढऱ्या शुभ्र साड्याही विक्रीस आणलेल्या आहेत. साडीमध्ये केरळा कॉटनची सफेद सोनेरी अन्‌ तिरंगी काठाची व तिरंगी वेलबुट्टी असलेल्या साडीला महिलांची जास्त मागणी आहे. तिरंगी झेंड्यातील रंग असलेल्या सलवार कुर्तीही मुलींसाठी उपलब्ध आहेत. या साड्यांच्या किंमती साधारण ३०० ते ६०० रुपयांपर्यंत आहेत. 

यावर्षी स्पंज, मखमली कागद, आकर्षक जाड प्लॅस्टिकच्या राख्या नेहमीप्रमाणे उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर अमेरिकन डायमंडच्या राख्याही विविध आकर्षक आकारांत विक्रेत्यांनी मांडल्या आहेत. परगावी पाठविण्यासाठी यामधील आकाराने लहान राख्या महिला घेत आहेत. लाहान मुलांचे लक्ष मात्र आजही छोटा भीम, डोरेमॉन, स्पायडर मॅन अशा विविध प्रकारची कार्टुन असलेल्या राख्यांवर आहे. या मुलांसाठीच्या राख्यांमध्ये कापसाच्या ‘बार्बी’, ‘टेडी’ या छोट्या बाहुल्या विराजमान झाल्या आहेत. या राख्यांच्या किमती पाच रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत. तसेच थोड्या हौशी बहिणी मात्र आवर्जुन सोन्या-चांदीच्या राख्या घेण्यासाठी सराफ पेढीवर आढळत आहेत. सोन्या-चांदीच्या राख्या ‘ओम’, गणपती, नावाचे पहिले अक्षर, बदाम व फुलांच्या अशा विविध आकारांत आहेत. त्यांच्या किमती ४०० रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंत आहेत. तर चांदीच्या राख्या ५० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. राख्यांच्या दुकानांवर आता महिलांची गर्दी उसळू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com