दोन वर्षानंतर "पोल्ट्री'ला अच्छे दिन !; रोज 20 लाख अंड्यांचे उत्पादन 

सचिन निकम 
Monday, 12 October 2020

लेंगरे परिसरासह तालुक्‍यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. लेअर, ब्रॉयलर कोंबड्यांची शेड मोठ्या संख्येने आहेत. तालुक्‍यात रोज सुमारे वीस लाख अंड्यांचे उत्पादन होते

लेंगरे (जि. सांगली) : पोल्ट्री अंड्याच्या चढउतार काळात आतापर्यंतचा उच्चांकी दराचा टप्पा गाठला आहे. या दरवाढीमुळे पोल्ट्री धारकांना उभारी मिळाली आहे. मात्र अंडी खरेदीत तेजीत असताना देखील व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. 

लेंगरे परिसरासह तालुक्‍यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. लेअर, ब्रॉयलर कोंबड्यांची शेड मोठ्या संख्येने आहेत. तालुक्‍यात रोज सुमारे वीस लाख अंड्यांचे उत्पादन होते. दोन वर्षांपासून खाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने, तर सहा महिन्यांपूर्वी कोरोना महामारीमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. त्यात दरातील चढ उतारामुळे अडचणीत आणखी सापडले आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय डबघाईला आल्याने काही व्यावसायिकांनी पोल्ट्रीचे शेड बंद केली. मात्र कोरोना काळात अंडी कोरोनाबांधितासाठी उपयुक्त ठरु लागल्यामुळे अंड्याला मागणी वाढली. यामुळे अंड्याचे भाव चांगलेच वधारले. त्याच बरोबरच पोल्ट्री व्यवसायाला लागणाऱ्या खाद्यासाठीच्या कच्चामालाचे दर कमी झाल्याने आता पोल्ट्री व्यवसायाला अच्छे दिन आलेत. 

कोरोना काळात अंड्यांची मागणी वाढली असली तरी दरात मात्र चढउतार सुरू आहेत. मागील महिन्यात चारशे सत्तर रुपये शेकडा असणाऱ्या दर आता पाचशे अठ्ठावन्न रुपये झाला आहे. कच्चामालातील मका दर मागील वर्षाच्या तुलनेने निम्यावर आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायाला दोन वर्षानंतर अच्छे दिन आले आहेत. परंतु अंडी खरेदीत मात्र व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे.

राष्ट्रीय समन्वय समिती (नेक)चे व्यापारी कमिशन दरावर बंधन नाही. अंडी दरातील घसरणीच्या वेळी चाळीस ते पन्नास पैसे (अंडी नग)कमिशन घेतात. अंडी दरात चढ-उतार झाला तरी व्यापाऱ्यांचे कमिशन दर मात्र कायम असते. आता अंड्याला मागणी वाढल्याने दरात चांगली वाढ झाली आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना अंडी दरवाढीमुळे दिलासा मिळाला. 

मागील दोन वर्षात व्यवसायात झालेला तोटा काही प्रमाणात भरून निघण्यास मदत होणार आहे. अजूनही अंड्याची दरवाढ होईल, असे व्यापाऱ्यांतून सांगितले जाते. कोरोनाच्या संकटात निरोगी राहण्यासाठी अंडी खाण्याचा डॉक्‍टर सल्ला देत आहेत.कोरोनाने सगळ्यांचे व्यवहाराचे गणित विस्कटले असले तरी पोल्ट्री व्यावसायिकांना मात्र पुरते तारले आहे. अंड्याची मागणी वाढल्याने दर वाढ झाली आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good day to Poultry after two years; Production of 20 lakh eggs daily