डाळिंब उत्पादकांसाठी यावर्षी चांगले दिवस

सतीश वैजापूरकर
रविवार, 6 मे 2018

मागील वर्षी एप्रिल व मे महिन्यांत रोज 10 ते 12 हजार कॅरेटची डाळिंबाची आवक होती. यावर्षी ती निम्म्याने घटली आहे. सध्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी येथे डाळिंब घेऊन येतात. चांगला भाव मिळत असल्याने ते खूश आहेत. मागील वर्षी विक्रमी उत्पादन झाल्याने एकाच वेळी माल बाजारपेठेत आला. त्यामुळे भाव गडगडले.

राहाता (नगर) - राज्यातील डाळिंबाची एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर आज उत्तम प्रतीच्या डाळिंबाला किलोला 125 रुपये दर मिळाला. दुसऱ्या प्रतीच्या डाळिंबांचे लिलाव सरासरी 60 ते 75 रुपये किलोने झाले. मागील वर्षी या काळात सरासरी 25 ते 40 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या डाळिंबाच्या दरात यंदा तिप्पट वाढ झाली आहे. आवक कमी झाल्यामुळे यंदा बाजारभाव वाढले असून चांगले दर मिळू लागल्याने उत्पादक शेतकरी खुष आहे. 

मागील वर्षी एप्रिल व मे महिन्यांत रोज 10 ते 12 हजार कॅरेटची डाळिंबाची आवक होती. यावर्षी ती निम्म्याने घटली आहे. सध्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी येथे डाळिंब घेऊन येतात. चांगला भाव मिळत असल्याने ते खूश आहेत. मागील वर्षी विक्रमी उत्पादन झाल्याने एकाच वेळी माल बाजारपेठेत आला, त्यामुळे भाव गडगडले.

गेल्या फेब्रुवारीपर्यंत सरासरी 25 ते 40 रुपये किलो भाव होते. मार्चपासून सरासरी भाव 70 ते 75 रुपये किलोपर्यंत वाढले. तेव्हापासून बाजारपेठेतील तेजी कायम आहे. याबाबत बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर व सचिव उद्धव देवकर म्हणाले, "सध्या येथील व्यापारी प्रामुख्याने उत्तर भारतात माल पाठवितात. चांगल्या प्रतीच्या डाळिंबांना मोठी मागणी आणि तुलनेत माल कमी आहे. त्यामुळे भाव वाढत आहेत.

नगर एक प्रमुख डाळिंब उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात डाळिंब बागा सध्या फुलोऱ्याचे सेटिंग सुरू आहे. गळती कमी होत असली, तरी फुलांची संख्यादेखील कमी आहे. मागील हंगाम तोट्यात गेला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी बागांवर फार खर्च केला नाही. त्यामुळे उत्पादन कमी, मात्र भाव चांगले मिळतील, अशी माहिती पिंपरी निर्मळ येथील डाळिंबउत्पादक नंदकुमार निर्मळ यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

Web Title: Good days for pomegranate this year