खुषखबर! सोलापुरात होतेय जिल्हा रुग्णालय

तात्या लांडगे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

- शासनाकडून आतापर्यंत मिळाला पाच कोटींचा निधी
- दोन मजली इमारतीचा तळमजला पुर्णत्वाकडे
- सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी 100 बेडची व्यवस्था
- स्त्री रोग व बालरोगासाठी 100 बेडचे नियोजन
- सार्वजनिक बांधकाम विभागाने केली वाढीव निधीची मागणी

सोलापूर, ता. 27 : सोलापूर जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालये असून 14 ग्रामीण रुग्णालये आणि 77 आरोग्य केंद्रे आहेत. त्याच्या जोडीला गावोगावी 431 आरोग्य उपकेंद्रे असून आणखी 147 उपकेंद्रे मंजूर आहेत. सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात अथवा मोफत उपचार मिळावेत, या उद्देशाने आता सोलापुरसाठी स्वतंत्र जिल्हा रुग्णालय सुरु होणार आहे. त्यासाठी पाच कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यामध्ये तळमजल्याचे काम झाले आहे. पुढील कामासाठी आता वाढीव निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

खुशखबर...राज्यात डिसेंबरपासून मेगाभरती

 

जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांसह आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयावर रुग्णांचा भार पडत असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरसाठी तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याने जिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला. आतापर्यंत रुग्णालयाच्या कामासाठी पाच कोटींचा निधी शासनाकडून देण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे मात्र, त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी वेळेवर मिळण्याची गरज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्‍त केली. एकूण 200 बेडच्या या रुग्णालयात 100 बेड स्त्री व बालकांसाठी तर उर्वरित 100 बेड अन्य सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी असणार आहेत.

ठळक बाबी...
- जिल्हा रुग्णालयामुळे सर्वोपचार रुग्णालयावरील रुग्णांचा भार होणार कमी
- डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन
- अत्याधुनिक यंत्रसामग्री अन्‌ तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत केली जाणार रुग्णसेवा
- स्त्री व बालकांच्या आजारांवरील उपचाराची जिल्हा रुग्णालयात असणार सोय
- तळमजल्याचे काम स्लॅबपर्यंत : निधी मिळताच पुढील कामाला येणार गती
-
वाढीव निधी मिळाल्यानंतर पुढील काम
जिल्हा रुग्णालयाच्या कामासाठी पाच कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यामधून रुग्णालयाचा तळ मजल्याचे काम केले असून आता तळ मजल्याच्या स्लॅब टाकण्याचे काम सुरु आहे. पुढील कामासाठी शासनाकडे आणखी निधीची मागणी केली आहे.
- संभाजी धोत्रे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सोलापूर

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news! There was a district hospital in Solapur