मोबाईलला "अलविदा' ; मैदानी खेळाला प्राधान्य 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

ते मैदानी खेळ खेळतात, पण.... 
आताच्या सोशल मीडिया, मोबाईलमुळे मुले कायम त्यावरच गुंतून पडलेली दिसतात. ती खेळ खेळतात, पण तो मोबाईलवर अशी सध्याची स्थिती आहे. ती आपण बदलली पाहिजे. त्यासाठी अभासी जगातून बाहेर पडून प्रत्यक्ष मैदानावर जावून खेळ खेळले पाहिजेत. यासाठी आपल्या देशातील या लाल मातीतील खेळ कोणते आहेत, खेळाडू कोणते आहेत, याचा अभ्यास असला पाहिजे. 
- संगीता जाधव, मुख्याध्यापिका 

सोलापूर ः मोबाईलच्या अतिवापरामुळे लहानग्यांना मैदानी खेळाचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांचे बालपण हरवून ती एकाच ठिकाणी गुंतून बसलेली दिसतात. मोबाईलमधील खेळ खळणे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. त्यामुळे मैदानी खेळांचे महत्व पटवून देण्यासाठी येथील महापालिकांच्या शाळेत मैदानी खेळांना प्राधान्य दिले जात आहे. सुटीच्या कालावधीतही मुले मोबाईलपासून दूर राहतील यासाठी शिक्षकांकडून पालकांचे प्रबोधन केले जाते. 

शाळांना सुट्या लागल्या की मुलांच्या मोबाईल खेळण्यात वाढ होते. त्यामुळे या मुलांचे पालकही हैराण होतात. मोबाईलमुळे घरातील घरपण हरवून मुलांमधील आणि पालकांमधील संवाद कमी होतो. काही वर्षांपूर्वी सुटी लागल्यावर लहान मुले मैदानावर खेळण्यासाठी जात असत. विटी-दांडू, लपंडाव, क्रिकेट, पकडापकडी आदी पारंपरिक खेळांमध्ये मुले रमायची. मात्र आता सुटी लागल्यावर बहुतांश मुले मोबाईलमधील खेळात गुंतली आहेत. त्यामुळे मुलांमधील मैदानी खेळ खेळण्याची ओढ कमी होत आहे. त्यामुळे मुलांचा व्यायाम कमी होत आहे. शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासापासून आजची लहान मुले दूर जात आहेत. पालकांनी मुलांना पारंपरिक खेळांची माहिती करून द्यावयास हवी, जेणेकरून त्यातून मुलांचा सर्वांगीण विकास होईल या हेतूने हा उपक्रम राबविला जात असल्याचे सहशिक्षक संतोष सुतार यांनी सांगितले. महाराष्ट्र 

आजच्या काळात अनेक नवनवीन क्रीडा प्रकार, खेळ अस्तित्वात येत आहेत, त्याकडे विद्यार्थी लगेच आकर्षिले जातात. मात्र, पारंपरिक व या मातीतले जे देशी खेळ आहेत, त्याकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसतात. शाळा, महाविद्यालयांनी आधुनिक खेळांबरोबरच देशी व पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, असे मत सहशिक्षिका सविता जाधवर यांनी व्यक्त केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Goodbye" to mobile; priority to outdoor play