सोलापूरच्या ओंकार जंजिरालला आंतरराष्ट्रीय ब्लॉगरचा सन्मान 

Omkar Janjiral
Omkar Janjiral

सोलापूर : भारतीय मसाल्यांचे पाश्‍चात्त्य देशांना पूर्वीपासूनच आकर्षण... ते आजही टिकून असल्याचा अनुभव आला चक्क मूळचा सोलापूरचा असलेल्या ओंकार जंजिराल या आंतरराष्ट्रीय ब्लॉगरमुळे... भारतीय मसाल्यांवर ओंकारने लिहिलेल्या ब्लॉगची भुरळ चक्क गुगलला पडली असून गुगलने त्याला थेट आपल्या सिलिकॉन व्हॅलीतील आलिशान ऑफिसात भारतीय स्वातंत्र्यदिनी सत्कारासाठी बोलवलेय. तसा मेलही गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी ओंकारला धाडला आहे. त्यामुळे हा ओंकार आज सोलापुरातीलच नव्हे तर पूर्ण भारतातील चर्चेचा चेहरा ठरलाय...! 

ओंकार हा ब्लॉगर वगैरे म्हटल्यावर तुम्हाला वाटेल ही कुठल्यातरी एसी केबिनमध्ये बसून फर्डा इंग्लिशमध्ये काहीबाही लिहिलेलं. पण तसे नाही... हा ओंकार सोलापूरच्या पूर्व भागातील अस्सल पद्मशाली...! त्यातही विना आई-वडिलांचा हा ओंकार आजोबांच्या छत्रछायेखाली वाढला. चौथीत असताना आजोबांनी त्याला एक छानसा कॉम्प्युटर घेऊन दिला. हेच निमित्त ठरले ओंकारच्या प्रगतीचे. कॉम्प्युटरचे वेड काही केल्या प्रयोगशील ओंकारला बसू देईना. हरतऱ्हेचे प्रयोग करत करत ओंकार लिहिता झाला. बरं, लिहिण्याचा विषयही काही फार आंतरराष्ट्रीय, बोजड असा नाही तर अगदी साधा म्हणजे आपल्या स्वयंपाक घरातील मसाल्यांचा घेतला. ओंकारचे दिवसेंदिवस ब्लॉग लेखन सुरूच होते. हळूहळू फॉलोअर्सची संख्या वाढत होती. विषयाला लोकप्रियता मिळत होती, अर्थात त्याचे श्रेय ओंकारच्या सहज सोप्या भाषेला अन्‌ भारतीय मसाल्यांच्या वेगळेपणालाही...! 

ओंकारचा ब्लॉग दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेला. आजमितीला त्याचे फॉलोअर्स 57 लाखांहून अधिक आहेत. या फॉलोअर्समधील एक आहेत गुगलचे सीईओ सुंदर पिचई..! हा स्पेशल फॉलोअर ओंकारच्या आयुष्यातील खरोखरच "टर्निंग पॉइंट'च ठरला आहे. कारण, या सुंदर पिचई यांनी ओंकारच्या अनेक ब्लॉगला लाईक केले, त्यावर कॉमेंट्‌सही केल्या. या ब्लॉगशिवाय तो ह्यूमन हेल्थ केअर, बिझनेस मॅनेजमेंट, आयटी सेक्‍शन, गुगल अँड ऍप डेव्हलपर व ऑटोबायोग्राफी आदी 22 विषयांवर ब्लॉग लिहितोय. 

उत्तम भाषाशैली, अभ्यासपूर्ण लेखन, विषयातील वैविध्य यामुळे ओंकारच्या ब्लॉगची लोकप्रियता वाढली. आज त्याचा कळस झाला तो म्हणजे त्याला अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीत असणाऱ्या गुगलच्या मुख्यालयातून सीईओ पिचई यांचा मेल आला. त्यात ओंकारला एक छानसे अविस्मरणीय गिफ्ट मिळाले, ते म्हणजे त्याचा गुगलच्या ऑफिसमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) हृद्य सत्कार करण्यात येणार आहे. 
गुगलने भारतातून एकूण 30 जणांची आंतरराष्ट्रीय ब्लॉगर म्हणून निवड केली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातून तिघे असून, सोलापुरातून ओंकारची निवड झाली आहे. 

इंडियन मॉडेल स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण झालेला ओंकार सध्या विडी घरकुल येथील गंगूबाई केकडे ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी शास्त्रमध्ये शिकत आहे. एमबीबीएस करण्याचा मानस असलेल्या ओंकारने आता निर्णय बदलून गुगलसोबत डिजिटल मार्केटिंग करण्याचा मानस व्यक्त केला आहे. संभाजीराव विद्यामंदिरातर्फे संचालक देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, मुख्याध्यापक वासुदेव इप्पलपल्ली आदींच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. 

कॉम्प्युटर व मोबाईलचा करा योग्य वापर 
आज लहान मुले व युवकांच्या हाती मोबाईल व कॉम्प्युटर आला आहे. मात्र याचा वापर फेसबुक, व्हॉट्‌सऍप या सोशल मीडियासाठीच होताना दिसतो. सोशल मीडिया आपला वापर त्यांच्या स्वत:साठी करून घेते. आपली माहिती, व्यवसाय आदी डाटा त्यामुळे व्हायरल होतो. मात्र इंटरनेटचा उपयोग शैक्षणिक, आरोग्यविषयक व इतर चांगल्या कामांसाठी केल्यास ज्ञानात भर पडू शकते, असा संदेश ओंकारने आजच्या युवा पिढीला दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com