सुमनताईंच्या पाठीशी भावासारखा उभा - गोपीचंद पडळकर

रवींद्र माने
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

साडेचार वर्षांपूर्वी आर. आर. पाटील यांच्यावर लोकसभा निवडणुकीत तोफ डागणारे गोपीचंद पडळकर यांनी आमदार सुमनताई पाटील यांच्या पाठीशी भावासारखा ठाम उभा असल्याचे वक्तव्य करून राजकारणाचे बदलते समीकरणाची झलक दाखवली.

तासगाव - राजकारणात कोण कधी कोणाची पाठराखण करेल. याचा नेम नसतो, त्याचा प्रत्यय  सावळज (ता. तासगाव) येथे पाणीप्रश्नावर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या ठिकाणी आज आला. साडेचार वर्षांपूर्वी आर. आर. पाटील यांच्यावर लोकसभा निवडणुकीत तोफ डागणारे गोपीचंद पडळकर यांनी आमदार सुमनताई पाटील यांच्या पाठीशी भावासारखा ठाम उभा असल्याचे वक्तव्य करून राजकारणाचे बदलते समीकरणाची झलक दाखवली.

साडेचार वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आर. आर. पाटील विरुद्ध भाजपचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांचा कलगीतुरा गेला होता, उमेदवार काँग्रेसचा आणि प्रचाराचा रोख आर. आर. पाटील यांच्यावर असा तो प्रकार होता.  चार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. खासदार संजयकाका पाटील यांचे तेव्हाचे प्रचारप्रमुख असलेले गोपीचंद पडळकर आज दररोज खासदारांवर तोफ डागण्याची एकही संधी  सोडताना दिसत नाहीत.

तशीच संधी सावळज ता. तासगाव येथे सावळजसह चार गावांतील शेतकरी आणि प्रमुख कार्यकर्ते या गावांचा सिंचन योजनेत समावेश करावा, या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला आज आमदार सुमनताई पाटील यांच्यासह अनेकांनी भेटून पाठिंबा दिला त्यात गोपीचंद पडळकर यांनीही भेट देऊन पाणी प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला.

मात्र त्यांनी भाषण करताना आमदार सुमनताई पाटील यांच्या पाठीशी भावासारखा उभा राहीन, असे म्हणून भावी राजकारणातील बदलाची जाणीव करून दिली.  झपाट्याने जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे बदलत आहेत.

Web Title: Gopichand Padalkar comment