#KolhapurFloods नोकरीचा राजीनामा देऊन गौरीताई धावल्या मदतीसाठी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - जिंदादिल कोल्हापूरशी एखाद्या व्यक्तीचं नातं निर्माण झालं की ते कायम टिकून राहतं. याच नात्याचा प्रत्यय कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी सरसावलेल्या पुण्यातील नांदेड सिटी येथील गौरी बाबर यांच्या कामामुळे आला आहे.

कोल्हापूर - जिंदादिल कोल्हापूरशी एखाद्या व्यक्तीचं नातं निर्माण झालं की ते कायम टिकून राहतं. याच नात्याचा प्रत्यय कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी सरसावलेल्या पुण्यातील नांदेड सिटी येथील गौरी बाबर यांच्या कामामुळे आला आहे. स्वतःच्या चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी या मदतकार्यात झोकून द्यायचा निर्णय घेतला आहे. स्वतः टेम्पोमधून पुणे ते कोल्हापूर प्रवास करीत त्यांनी जमवलेले साहित्य आमदार सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

गौरी यांचे सासर कुरुंदवाड. नोकरीच्या निमित्ताने त्यांचे कुटुंब पुणे येथे राहते; पण सासू-सासरे कोल्हापुरात असल्याने कोल्हापुरात त्यांचे येणे-जाणे आहेच. विवाहानंतर कोल्हापूरची संस्कृती आणि माणुसकी, दिलदारपणा त्यांना भावला. त्यातून कोल्हापूरशी वेगळं नात तयार झालं.

गेल्या आठवड्यात कोल्हापुरात पुराने थैमान घातले. अनेक लोक स्थलांतरित झाले. त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी कोल्हापूरकरांनी जीव धोक्‍यात घालून प्रयत्न केले. आमदार पाटील हेही यात अग्रभागी होते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी लोकांना सोशल मीडियावर आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत गौरी यांनी मदत गोळा केली.

गौरी सांगतात, ‘‘कोल्हापूरच्या पुराच्या बातम्या ऐकून अस्वस्थ होते. यादरम्यान आमदार सतेज पाटील यांचा डायमंड हॉस्पिटल परिसरातील व्हिडिओ पाहिला. स्वतः बोटीतून जाऊन त्यांनी अजूनही कोण पुरात अडकले आहे का, याची खात्री करून घेतली. यासाठी बोटीत बसून त्यांना जोरजोराने आवाज देताना पाहून मी भारावून गेले. 

राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमदार पाटील यांनी केलेली ही धडपड पाहिली. या पूरग्रस्तांना मदत करण्याची प्रेरणा हा व्हिडिओ पाहून मिळाली आणि काम सुरू केले.’’

पाहता-पाहता टेम्पो भरला
नांदेड सिटीमधील फ्लॅटधारकांसह सोशल मीडियावर मैत्रिणींनाही मदतीची विनंती केली. पाहता-पाहता मदतीचा ओघ सुरू झाला. चादर, धान्य, कपडे, ब्लॅंकेट, पाणी बाटल्या, बिस्किटे असे सहा टेम्पो साहित्य सांगली, कोल्हापूर, कुरुंदवाडला पाठविले. अजूनही खूप मदत गोळा झाली असून, सतीश मगर यांच्या माध्यमातून ती आमदार सतेज पाटील यांच्याकडे पाठविणार आहे. अशा कामासाठी वेळ देता यावा, म्हणून नोकरीचा राजीनामा दिला. इतरवेळी सर्वांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या कोल्हापूरसाठी ही माझी कृतज्ञतेची भावना आहे, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gouri Babar help to flood affected area in Kolhapur