हमीभावाने सोयाबीन खरेदी कधी? 

हमीभावाने सोयाबीन खरेदी कधी? 

काशीळ -  जिल्ह्यात खरिपातील काढणी अंतिम टप्प्यात आली असतानाही नाफेडकडून खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने सोयाबीनची किमान आधारभूत किंमतही कागदावरच असून सध्या सोयाबीन दोन हजार 800 ते तीन हजार रुपये दराने खरेदी केले जात आहे. खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदी होत नसल्याने प्रशासन व्यापाऱ्यांना पूरक भूमिका घेत असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. 

खरीप हंगामात पावसावर कमी कालावधीत सहज येणारे आणि दसरा, दिवाळी व रब्बी हंगामास भांडवल उपलब्ध करून देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. दिवाळीचा सण जवळ आला असताना अजून सोयाबीनची नोंदणी केली जात आहे. प्रत्यक्ष खरेदी कधी सुरू होणार, याबाबत अजूनही काहीच स्पष्ट होत नाही. मागील दोन वर्षांपासून सोयाबीनच्या दरात झालेल्या चढ-उतारामुळे क्षेत्रात घट होत आहे. या खरिपात जवळपास 12 हजार हेक्‍टरवर सोयाबीनच्या क्षेत्रात घट झाली आहे. सध्या सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आहे. 

केंद्र सरकारने किमान हमीभाव जाहीर करण्याचे धोरण घेतले आहे. यंदा सोयाबीनचा हमीभाव तीन हजार 399 रुपये जाहीर केला आहे. त्यानुसार किमान हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करू नये, असा कायदाच सरकारने केला आहे. मात्र, हमीभाव हा खरेदी केंद्रापुरता मर्यादित असतानाही प्रत्यक्ष खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. पणन विभागाकडून जिल्ह्यात सातारा, कोरेगाव व वाई येथे नोंदणी करण्यास सुरवात केली आहे. मात्र, त्यापैकी एकाही केंद्रावर खरेदी केली जात नाही. काढलेले सोयाबीन ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना ते लगेच विक्रीसाठी बाजारपेठेत आणले लागत आहे. त्याचा व्यापाऱ्यांकडून फायदा उठवत दोन हजार 800 ते तीन हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करत लूट केली जात आहे. 

प्रशासनासह पणन विभागही गप्प 
जिल्ह्यात सध्या 80 टक्के क्षेत्रातील सोयाबीनची काढणी व मळणीची कामे झाली आहेत. आर्थिक विवंचनेमुळे सोयाबीनची मिळेल त्या दरात शेतकरी विक्री करत आहेत. तरीही शासनाने गांधारीची भूमिका घेत खरेदी केंद्रे सुरू करण्याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे एकीकडे व्यापारी क्विंटलमागे 600 रुपयांनी शेतकऱ्यांना लुबाडत आहेत, तर दुसरीकडे पणन विभाग गप्प आहे. परिणामी व्यापारीच मालामाल होत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com