शासकीय कार्यालयातील उपाहारगृहे बचत गटांनाच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

सांगली -महिला बचत गट पारंपरिक उत्पादनातून बाहेर पडलेत. बाजारात मागणी असणाऱ्या उत्पादनांनाही सुरवात झालीय. व्यवस्थापन आणि विक्रीत भरपूर पल्ला गाठावा लागणार आहे. बचत गटांच्या महिलांना वर्षभर कमवायला हवे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय कार्यालयातील उपाहारगृहे महिला बचत गटांनाच दिली जातील, असे मत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज येथे व्यक्त केले. येथील तरुण भारत मंडळाच्या क्रीडांगणावर महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन आज सुरू झाले. जिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.

सांगली -महिला बचत गट पारंपरिक उत्पादनातून बाहेर पडलेत. बाजारात मागणी असणाऱ्या उत्पादनांनाही सुरवात झालीय. व्यवस्थापन आणि विक्रीत भरपूर पल्ला गाठावा लागणार आहे. बचत गटांच्या महिलांना वर्षभर कमवायला हवे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय कार्यालयातील उपाहारगृहे महिला बचत गटांनाच दिली जातील, असे मत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज येथे व्यक्त केले. येथील तरुण भारत मंडळाच्या क्रीडांगणावर महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन आज सुरू झाले. जिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपाध्यक्ष रणजित पाटील, बांधकाम सभापती भाऊसाहेब चौगुले उपस्थित होते. प्रदर्शन रविवार( ता. १२) पर्यंत सुरू राहणार आहे. 

श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘महिला बचत गटांच्या उत्पादनांचे ब्रॅंडिंग केले पाहिजे. ग्राहकांच्या आवडीनिवडींचा विचार करून वस्तूंची निर्मिती केली पाहिजे. गटांतील महिलांकडे व्यापारी दृष्टिकोन असला पाहिजे. जिल्हा प्रशासन म्हणून सर्व पीएचसी, सर्व तहसील, पंचायत समित्या, झेडपी कार्यालयात उपाहारगृहे महिला गटांकडेच चालवण्यास दिली जातील. स्वतःच्या विकासासाठी गटांच्या सर्व महिलांची अटल पेन्शन योजना, पीपीएफ खाती काढलीच पाहिजेत.’’

स्नेहल पाटील म्हणाल्या, ‘‘बचत गटांमुळेच महिला घराबाहेर पडल्या अन्‌ आता स्वावलंबी झाल्याचं समाधान आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून आम्ही सर्व उपाहारगृहे महिला गटांनाच चालवण्यास देऊ.’’

सीईओ डॉ. भोसले, बांधकाम सभापती भाऊसाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने यांनी प्रास्ताविकात गटांसाठी दिलेल्या कर्जावरील सर्व व्याजाचा शासन परतावा देत असल्याचे सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी उपस्थित होते. प्रिया देशमुख यांनी आभार मानले. 

प्रदर्शनात १०५ स्टॉल

‘दख्खन जत्रा’ या नावाने भरणाऱ्या प्रदर्शनात १०५ स्टॉल आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषदेतर्फे प्रदर्शनात सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील बचत गट सहभागी झाले. प्रदर्शनात सांगलीची प्रसिद्ध हळद, बेदाणा, वैशिष्ट्यपूर्ण नित्योपयोगी वस्तू, शाकाहारी, मांसाहारी रुचकर खाद्य पदार्थ, वेत, बांबूच्या शोभिवंत कलाकुसरीच्या वस्तू, मातीची भांडी, इमिटेशन ज्वेलरी आदी स्टॉल आहेत. 

Web Title: Government office canteens self help group