शासकीय कार्यालये उजळणार सौरऊर्जेने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

कोल्हापुरात उपक्रम - जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेसह विद्यापीठात सौरऊर्जा प्रकल्प

कोल्हापुरात उपक्रम - जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेसह विद्यापीठात सौरऊर्जा प्रकल्प
कोल्हापूर - विजेची वाढती मागणी व त्या तुलनेत होणारा कमी पुरवठा यावर मार्ग काढण्यासाठी सौरऊर्जा वापराचा पर्याय पुढे येत आहे. प्रशासनाचे प्रमुख कार्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, शिवाजी विद्यापीठ, महापालिका व वन विभागाच्या इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील हा प्रकल्प येत्या दोन दिवसांत सुरू होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील वडगावसह गडहिंग्लज नगरपालिकेतही असे प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्ताव सादर झाले आहेत. इतर नगरपालिकांसह शासनाची तालुका पातळीवर असलेली कार्यालयेही सौरऊर्जेने उजळून टाकण्याचा प्रयत्न असून, शासनदरबारी यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

मागणीच्या तुलनेत विजेचा पुरवठा कमी असला, तरी त्यावरील पर्यायांबाबत मात्र जनजागृतीचा अभाव दिसतो. पाणी गरम करण्यासाठीचा सोलर हिटर वगळता घरगुती वापरासाठी सोलरचा वापर ही संकल्पनाच अजून मूळ धरत नाही अशी स्थिती आहे. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातील रस्ते सौरऊर्जेने उजळण्याचा प्रयत्न झाला.

पण यासाठी बसवण्यात येणाऱ्या बॅटरीचीच चोरी होऊ लागली परिणामी बहुंताशी गावांत सौरऊर्जेच्या बल्बचे खांब नुसतेच उभे आहेत.

नागरिकांत जनजागृती करूच; पण त्याची सुरवात आपल्यापासून करू, हा हेतू डोळ्यांपुढे ठेवून जिल्ह्यातील प्रमुख शासकीय कार्यालये पहिल्यांदा सौरऊर्जेने उजळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या प्रकल्पातून तयार होणारी वीज महावितरणला द्यायची व त्या बदल्यात कार्यालयाचे महावितरकडून येणारे बिल माफ करून घ्यायचे, असे हे प्रस्ताव आहेत. या माध्यमातून सौरऊर्जेचा तर वापर वाढेलच; पण बिलापोटी द्याव्या लागणाऱ्या लाखो रुपयांची बचत होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे महिन्याचे विजेचे बिल 18 ते 19 लाख रुपये येते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील 60 किलोवॉटचा हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, येत्या आठवडाभरात त्यातून वीजनिर्मिती सुरू होईल. शिवाजी विद्यापीठातील 180 किलोवॉटच्या या प्रकल्पाची निविदा निघाली आहे.

कार्यालयनिहाय असे आहेत प्रकल्प
शिवाजी विद्यापीठ - 180 किलोवॉट
जिल्हा परिषद - 80 किलोवॉट
जिल्हाधिकारी कार्यालय - 65 किलोवॉट
वनविभाग - 30 किलोवॉट
महापालिका - 20 किलोवॉट

किती वीज मिळणार
एक किलोवॉटच्या प्रकल्पातून दिवसाला किमान 4.50 युनिट वीज मिळणार आहे. या सूत्रानुसार शिवाजी विद्यापीठातील प्रकल्पातून दिवसाला 810 युनिट वीजनिर्मिती शक्‍य आहे. महिन्याला 24 हजार 300 युनिट वीज विद्यापीठात तयार होईल. ही वीज महावितरणला विकली जाईल. त्यातून शिवाजी विद्यापीठाचे वीज बिल व महावितरणला विद्यापीठाकडून मिळालेली वीज याचा ताळमेळ घालून बिल दिले जाईल किंवा युनिट जास्त झाले तर ते पुढील महिन्याच्या बिलात धरले जाईल, असा करार महावितरण व विद्यापीठात झाला आहे.

Web Title: government office light by solar power