कोयना-कन्हेर धरणातील पुनर्वसितांसाठी शासनाकडून निधी मंजूर

सचिन शिंदे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पहिल्या टप्प्यात पंढरपूर तालुक्यातील विविध कामांसाठी 50 लाख 70 हजार तर मंगळवेढा तालुक्यातील कामांसाठी 27 लाख 93 हजारांचा निधी वर्ग झाला आहे.

कऱ्हाड - कोयना व कन्हेर धरणातून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात पुनर्वसित झालेल्या गावांच्या विकासासाठी शासनाने सुमारे 78 लाख 63 हजार रूपये वर्ग केले आहेत. त्यातून त्या गावात नागरी सुविधा पोहोचविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात पंढरपूर तालुक्यातील विविध कामांसाठी 50 लाख 70 हजार तर मंगळवेढा तालुक्यातील कामांसाठी 27 लाख 93 हजारांचा निधी वर्ग झाला आहे. त्यात ग्रामपंचायत कार्यालय, शाळेला कुंपण बांधणे, दहनभूमी बांधणे व विंधन विहीरींची सुविधा देण्यात येणार आहे. त्यातील काही कामे पूर्ण आहेत. त्याची दयेक बाकी आहे. काही कामे अपूर्ण आहे. ती या निधीतून पूर्ण करायची आहेत. मंगळवेढा येथील दोन तर पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, वाखरी व इसबाबी येथील वेगवेगळ्या सुविधांचा त्यात समावेश आहे. 

कोयना धरणग्रस्तांनी काही दिवसापूर्वी सुमारे 22 दिवस कोयना येथे सुमारे तीन ते चार हजार प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन आंदोलन केले. 64 वर्षापूर्वीपासून रखडलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी आंदोलन केले. त्याबाबत 'सकाळ'ने त्याची वृत्तमालिका छापली होती. त्या आंदोलनाची दखल घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो प्रश्न मार्गी लावण्याबाबातचे आदेश दिले होते. त्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांच्या नेतृत्वाखाली कृतीदलाची स्थापना करण्यात आली आहे. त्याशिवाय मंत्री स्तरावर उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. जितक्या लवकर कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावता येईल, तितक्या लवकरच तो मार्गी लावण्याचे निश्चित केले आहे. त्याचा भाग म्हणून कोयनेसह कण्हेर प्रकल्पग्रस्तांच्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात पुनर्वसित झालेल्या गावांना सुविधा देण्यासाठी सुमारे 78 लाख 63 हजारांचा निधी मंजूर केला आहे. 

पुण्याचे विभागीय आयुक्तांकडून कोयनेसह कन्हेर व उजनी प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसित झालेल्या गावांत विविध सुविधा पुरवण्यास चार कोटी 21 लाख 29 हजारांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्या प्रस्तावातील कोयना व कण्हेर धरणग्रस्तांच्या पुनर्वसित गावांत विविध सुविधा पुरवण्यासाठी त्वरीत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या गावात पुर्नवसित गावातील विविध सुविधांची देयके बाकी आहेत. ती 78 लाख 63 हजाराच्या रकमेतून देवून तेथे सुविधा देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार मंगळवेढा येथील शाळेला कुंपन व बिंत घालण्याच्या कामासाठी 16 लाख 76 हजारांचा तर दहनभूमी शेड व विंधन विहीरीसाठी अकरा लाख 17 हजारांची रक्कम मंजूर आहे. पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे ग्रामपंचायत कार्यालयासाठी 12 लाख 39 हजार, दहनभूमी व विंधन विहीरीसाठी तेरा 13 लाख 23 हजार, वाखरी येथे दहनभूमी व विंधन विहीरीसाठी अकरा लाख 18 हजार तर इसबाबी येथे दहनभूमी व विंधन विहीरीसाठी 13 लाख 29 हजारांचा निधी मंजूर आहे.

Web Title: Government sanctioned funds for resettlement in Koyna-Kanher dam