भिलवडीत पूरग्रस्त मदतीत  शासकीय यंत्रणेचा घोटाळा - स्थायीत चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

भिलवडी (ता. पलूस) येथे महापूरातील बाधितांना मदत वाटपात घोटाळा झाला आहे. माहिती अधिकार कायद्याव्दारे हाती आलेल्या माहितीत अनेकांनी दोन-दोन लाभ घेतल्याचे समोर आले आहे. काहींचे पंचनामे आणि यादीत नाव नसताना त्यांना मदत मिळाली आहे.

सांगली ः भिलवडी (ता. पलूस) येथे महापूरातील बाधितांना मदत वाटपात घोटाळा झाला आहे. माहिती अधिकार कायद्याव्दारे हाती आलेल्या माहितीत अनेकांनी दोन-दोन लाभ घेतल्याचे समोर आले आहे. काहींचे पंचनामे आणि यादीत नाव नसताना त्यांना मदत मिळाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी रोहित भोकरे या सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे. या प्रश्‍नावर स्थायी समितीच्या बैठकीत समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनी चर्चा घडवली असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. 

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात अनेकांची घरे पडली. काहींच्या घरात पाणी होते. ज्यांची घरे पडली त्यांना 95 हजार 100 रुपये तर पाणी आल्याने नुकसान झालेल्यांना 6 हजार रुपये अनुदान दिले जात आहे. त्या मदतीपासून भिलवडीतील सुमारे चारशे घरे वंचित असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी याआधी जिल्हा परिषदेला दिली आहे. त्यासाठी पुन्हा यादी बनवण्याचे काम सुरु आहे, मात्र ती यादी प्रत्यक्ष पाहणी करून बनवली जात आहे की पंख्याखाली बसून याविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. रोहित भोकरे यांनी माहिती अधिकारातून उपलब्ध केलेली यादी श्री. गुडेवार यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. त्यात एकाच कुटुंबातील दोन-तीन सदस्यांनी लाभ घेतल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी विभक्त राहिलेल्या अनेक कुटुंबांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. 

एका ग्रामसेवकाने स्वतःच्या, पत्नीच्या आणि आईच्या नावाने लाभ उचलला आहे. हा बेकायदेशीर असल्याचे प्रकरण प्रमोद शेंडगे यांनी स्थायी समितीसमोर मांडले. त्याची तटस्थपणे चौकशी व्हावी, त्यांना असा लाभ घेता येतो का? नसेल तर तो कुणी दिला? त्यामागे शासकीय यंत्रणेतील आणखी कोण-कोण आहे, याची चौकशी व्हावी, ती श्री. गुडेवार यांनीच करावी, अशी मागणी श्री. शेंडगे यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government scam in flood relief in Bhilwadi - Standing discussion