
बेळगाव : ग्रामीण भागातील सरकारी शाळांना रोजगार हमी योजनेतून हायटेक भोजनालय निर्माण करून दिले जाणार आहे. यासाठी रोहयोतून १० ते १५ लाख रुपये अनुदान खर्च केले जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यात ४०४ सरकारी शाळांमध्ये भोजनालय इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे.
माध्यान्ह आहार योजनेंतर्गत प्रत्येक सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना शासनाकडून दुपारचे भोजन दिले जाते. त्यासाठी ग्रामीण भागातील बहुतेक शाळांमध्ये स्वयंपाक खोली तयार करुन देण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था शाळेच्या पटांगणात किंवा वर्गखोलीतच केली जाते. अनेकवेळा विद्यार्थ्यांना वर्गखोलीतच खाली बसून जेवण करावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी ग्रामीण विकास आणि पंचायतराज खात्याने रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेत एकाच वेळी ३०० विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय होईल, अशी भव्य भोजनालय इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
चालू आर्थिक वर्षातच ही योजना कार्यान्वित झाली आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात याबाबतचा प्रस्ताव तयार करुन अनेक ग्रामपंचायतींनी तो मंजुरीसाठी जिल्हा पंचायतीला पाठविला आहे. रोहयोतून ग्रामीण भागातील सरकारी शाळांचा विकास केला जात आहे. यात शाळेच्या मैदानाचा विकास, स्वच्छतागृह, ग्रंथालय निर्माण करणे, शाळेची संरक्षक भिंत बांधणे, शाळेच्या आवारात फळभाज्यांची लागवड करणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ आता स्वयंपाक खोली आणि भोजनालय निर्माणाचेही काम हाती घेतले जात आहे.