सांगली जिल्हा परिषदेचे कामकाज दिवसभर ठप्प 

घनश्‍याम नवाथे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सांगली - जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने आज एकदिवसीय लाक्षणिक संप केला. संपात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सुमारे दोन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. 

सांगली - जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने आज एकदिवसीय लाक्षणिक संप केला. संपात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सुमारे दोन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. 

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या - 

  • सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी विविध संवर्गातील वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात.
  • दिवाळीपूर्वी सातवा वेतन आयोग आश्‍वासन दिल्याप्रमाणे लागू करावा.
  • या अगोदर गणेशोत्सवात 25 हजार रूपये अग्रीम म्हणून द्यावे.
  • 2005 नंतर शासन सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
  • आकृतीबंध सुधारणा करण्याच्या नावाखाली वर्ग तीन व चारची पदे कमी करण्याचा घाट घातला आहे, तो थांबवावा.
  • जिल्हा परिषदेमध्ये करारावर किंवा कंत्राटी पद्धतीने दिलेल्या नेमणुका शासनाने नियमित कराव्यात.
  • ग्रामविकास विभागाच्या अधिकारावर अतिक्रमण होऊ नये.
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता जानेवारी 2016 पासून द्यावा.
  • अनुकंपा तत्वावर भरतीसाठी त्वरीत शासन निर्णय व्हावा.

युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने जिल्हा परिषदेसमोर आज जमले होते. मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. सुमारे दोन हजार कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे संपूर्ण काम आज दिवसभर ठप्पच होते. निदर्शनानंतर शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले. 

विविध संघटनांचा सहभाग 

युनियनच्या संपात लेखा कर्मचारी संघटना, आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, विस्तार अधिकारी संघटना, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, औषध निर्माण अधिकारी संघटना, बहुजन आरोग्य कर्मचारी संघटना, पशुचिकित्सा व्यवसाय कर्मचारी संघटना, कास्ट्राईब संघटना, वाहन चालक कर्मचारी संघटना, महिला कर्मचारी आघाडी, लिपीक वर्गीय कर्मचारी संघटना आदी संघटनांचा सहभाग होता. 

युनियनचे जिल्हाध्यक्ष सुभाष मरिगुद्दी, कार्याध्यक्ष अशोक पाटील, दत्तात्रय शिंदे, बजरंग संकपाळ, निळकंठ पट्टणशेट्टी, दादासाहेब पाटील, उज्वला हिप्परकर, गीता शेंडगे, शुभदा चिटणीस, वीणा शिंगाडे, विद्या पाटील, धोंडिराम बेडगे, दत्ता पाटील, लक्ष्मण माने, एस. एल. कुंभार, मोहन गोसार्डी, चंद्रकांत दबडे उपस्थित होते. 

दिवसभर शुकशुकाट- 
जिल्हा परिषद आवारात आज आंदोलनाचा गोंगाट सोडला तर दिवसभर आतमध्ये शुकशुकाट जाणवत होता. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत आणि इतर अधिकारी यांचीच उपस्थिती होती. पंचायत समित्यांमध्येही हेच चित्र दिसून आले. 

Web Title: Government servant in Sangli ZP on strike