तावडेला हजर करण्याचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील दुसरा संशयित वीरेंद्र तावडेला सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर करण्याचे आदेश आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी तपास यंत्रणेला दिले. या प्रकरणातील तीन व चार क्रमांकाचे संशयित विनय पवार आणि सारंग अकोळकरच्या शोधासाठी प्राप्त अधिकाराचा वापर तपास यंत्रणेने करावा, अशा सूचनाही न्यायालयाने केल्या. संशयित समीर गायकवाडवर चार्जफ्रेम दाखल करण्याची प्रक्रिया आजही लांबणीवर पडली. याबाबतची पुढील सुनावणी न्यायालयाने 21 जानेवारीला ठेवली आहे. 

पानसरे हत्येप्रकरणी संशयित समीर गायकवाडला सुरवातीला तपास यंत्रणेने अटक केली. त्यानंतर दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडेला अटक केली. या दोन्ही खटल्यांची सुनावणी सध्या एकत्रित अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर सुरू आहे. पानसरे यांच्या हत्येचा तपास अद्याप सुरू आहे. त्यामुळे संशयित समीर गायकवाडवर चार्जफ्रेम (दोषनिश्‍चिती) करू नये, अशी मागणी करणारी याचिका पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याची पुढील सुनावणी 10 मार्चला ठेवण्यात आली आहे. ही बाब विशेष सरकारी वकील ऍड. शिवाजीराव राणे यांनी आज न्यायाधीश बिले यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आज चार्जफ्रेमबाबत सुनावणी होऊ शकली नाही. 

दुसरा संशयित वीरेंद्र तावडे सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात आहे. त्याला न्यायालयात हजर करावे अशी मागणी यापूर्वी त्याच्या वकिलांनी केली होती. त्याच्याशी भेट घेऊन खटल्याबाबत चर्चा करायची आहे, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते. पण अद्याप त्याला न्यायालयात हजर करण्यात आले नाही. आज न्यायाधीश बिले यांनी तावडेला पुढील सुनावणीवेळी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. 

विशेष सरकारी वकील ऍड. राणे यांनी या प्रकरणातील दुसरे दोन संशयित विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, कऱ्हाड) आणि सारंग दिलीप अकोळकर (रा. शनिवार पेठ, पुणे) या दोघांच्या शोधासाठी उद्‌घोषणा जाहीर करण्याची परवानगी मागितली. त्यात त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्याची आणि मालमत्ता जप्त करण्याच्या परवानगीची मागणी केली. त्यावर न्यायाधीश बिले यांनी पवार व अकोळकर या दोघांना पोलिसांनी अद्याप अटक केली नाही, तपास यंत्रणेने यापूर्वीच त्या दोघांना फरारी घोषित केले आहे, त्या दोघांचा पोलिसांनी लवकर शोध घ्यावा, त्यांची छायाचित्रे लावण्याचे आणि मालमत्ता जप्तीबाबतची कारवाई करण्याचे अधिकार तपास यंत्रणेला प्राप्त आहेत, ते त्याचा उपयोग करू शकतात, असे स्पष्ट केले. 

येरवडा कारागृहात तावडेला वाचण्यासाठी पुस्तके द्यावीत, असा अर्ज मागील सुनावणीवेळी न्यायालयात केल्याचे आणि त्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. मात्र अद्याप त्याला पुस्तके न मिळाल्याचे तावडेचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर कारागृह प्रशासनाने आपल्याला अद्याप पुस्तकेच प्राप्त झाली नसल्याचे स्पष्ट केले. यासंबंधीची वेळेत पूर्तता न झाल्यास 21 जानेवारीच्या सुनावणीवेळी तावडेला न्यायालयातच परवानगीने पुस्तके द्या, असेही न्यायाधीश बिले यांनी सांगितले. 

Web Title: govind pansare murder case