पानसरे हत्या प्रकरणः हत्येपूर्वीच दीड वर्ष आधी रचला कट?

पानसरे हत्या प्रकरणः हत्येपूर्वीच दीड वर्ष आधी रचला कट?

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट हत्येपूर्वी दीड वर्ष आधी शिजला होता. कटात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येतील  संशयित अमोल काळेचा सहभाग होता का? याचा तपास यंत्रणेकडून केला जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, डॉ. दाभोलकर हत्येतील संशयित शरद कळसकर हा चार वर्षे कोल्हापुरात वास्तव्यास होता. त्या वेळी त्याच्या संपर्कात २० ते २५ जण होते. ते बेळगाव व बंगळूर येथे शस्त्र प्रशिक्षण घ्यायला जात होते. तेथून परतल्यानंतर ते कळसकरच्या घरी मुक्कामाला थांबायचे, अशी माहिती तपास यंत्रणेच्या चौकशीतून पुढे आली असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजते. 

‘अंनिस’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित अमोल काळेला ‘सीबीआय’ने अटक केली. त्याची पोलिस कोठडी संपल्याने पानसरे हत्येच्या तपासासाठी कोल्हापूर एसआयटीने त्याचा ताबा मागितला आहे. त्यास मंजुरीही मिळाली. दोन दिवसांत त्याला ताब्यात घेतले जाण्याची शक्‍यता आहे. पानसरे यांची हत्या होण्यापूर्वी दीड वर्ष अगोदर त्यांच्या हत्येचा कट कोल्हापुरातच शिजला.

पानसरे यांचे वास्तव्याचे ठिकाण, ते कधी व कोठे येतात-जातात यासंबंधीची माहिती जमा करून याचा प्लॅन तयार केल्याचे सीबीआय एसआयटीच्या तपासातून पुढे आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. हा प्लॅन तयार करण्यात अमोलचा सहभाग होता का? हे तपासण्याचे काम सुरू आहे. या हत्येचा सर्वांत मुख्य सूत्रधार पडद्यामागे लपल्याचाही संशय तपास यंत्रणेला असून, त्याचा शोध सुरू असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. 

राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये घातपात घडविण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना गेल्या महिन्यात राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. यातील संशयित शरद कळसकर हा डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी ‘सीबीआय’च्या ताब्यात आहे. त्याचे कोल्हापुरात चार वर्षे वास्तव्य होते. टर्नरचे प्रशिक्षण व कामासाठी तो कोल्हापुरात होता. तो उद्यमनगर व कळंबा परिसरात राहत होता, अशी माहितीही तपास यंत्रणेच्या प्राथमिक तपासातून पुढे आली. 

काळेचा ताबा दोन दिवसांत
कळसकरकडे मुक्कामाला येणाऱ्यांमध्ये कोण होते, त्यातील किती जणांनी शस्त्र चालविण्याचे, त्यांनी नेमके कोठे प्रशिक्षण घेतले, त्यांना कोणी प्रशिक्षण दिले, त्यातील कोणी हत्येत सहभागी होते का? याबाबत तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.

दरम्यान, अमोलचा ताबा देण्यास ‘सीबीआय’ने कोल्हापूर एसआयटीला परवानगी दिली आहे. कर्नाटक एसआयटीच्या परवानगीनंतर दोन दिवसांत अमोल काळेचा ताबा कोल्हापूर एसआयटी घेणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com