पानसरे हत्या प्रकरणः वाहन, शस्त्रजप्तीचे आव्हान कायम

पानसरे हत्या प्रकरणः वाहन, शस्त्रजप्तीचे आव्हान कायम

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करून झालेल्या हत्येला चार वर्षे झाल्यानंतरही गुन्ह्यात वापरलेले वाहन, शस्त्र जप्त करण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे. मुळातच तपास यंत्रणेला स्वतःला संशयित आरोपी शोधण्यात यश आलेले नाही. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासातून पानसरे हत्येतील संशयितांची नावे कर्नाटक पोलिसांनी पुढे आणल्यानंतर कारवाई झाली.  

सागरमाळ येथे भरदिवसा ज्येष्ठ नेते पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ ला हल्ला झाला. त्यात ते दोघे गंभीर जखमी झाले. उपचारांदरम्यान २० फेब्रुवारी २०१५ ला गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला. तपास यंत्रणेला सप्टेंबर २०१५ मध्ये पहिला संशयित समीर गायकवाडला पकडण्यात यश आले. यानंतर तपास यंत्रणेने दुसरा संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला २०१६ मध्ये अटक केली.

न्यायालयाने त्या दोघांचा जामीन मंजूर केला. यानंतर तपास यंत्रणेच्या रडारवर असणारे संशयित विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड), सारंग दिलीप आकोळकर हे मात्र हाती लागले नाहीत. या घटनेनंतर डॉ. एम. एम. कलबुर्गी, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. या सर्व हत्यांमध्ये साधर्म्य असल्याचे आढळले आहे. या गुन्ह्यांचा तपास सीबीआय, एसआयटी महाराष्ट्र, सीआयडी कर्नाटक, एसआयटी कर्नाटक यांनी सुरू केला. यामध्ये कर्नाटक पोलिसांना संशयित आरोपींना पकडण्यात यश आले.

गेल्या सहा महिन्यांत तपास यंत्रणेने संशयित अमोल काळे, भरत कुरणे, अमित डेगवेकर, वासुदेव सूर्यवंशी या चौघांना अटक केली. न्यायालयीन पातळीवर मेघा पानसरे, पानसरे यांचे समर्थक आणि सरकार पक्षाचे विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे लढा देत आहेत. 

मारेकऱ्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन, शस्त्र अद्याप हाती लागलेले नाही. तसेच गुन्ह्यातील संशयित विनय पवार व सारंग आकोळकर सापडू शकलेले नाहीत. पानसरे, डॉ. दाभोलकर, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश या चौघांच्या हत्येत साधर्म्य असल्याचे तपासात पुढे आले. 

या सर्व हत्या एकाच विचाराच्या व्यक्तीने केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. पण पानसरे हत्येतील संशयितांवर दोषनिश्‍चिती झालेली नाही. तपासाबाबत न्यायालयाकडूनही अनेकदा तपास यंत्रणेवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. 

कर्नाटकात झालेल्या गौरी लंकेश हत्येच्या तपासात पानसरे हत्येतील संशयितांची नावे पुढे येतात, त्यानंतर तपास यंत्रणा त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करते; पण हे संशयित एसआयटीच्या तपासात का पुढे आले नाहीत, याबाबत प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com