गोविंद पानसरे यांच्या हत्येचे पुरावे पुढे येणार?   

गोविंद पानसरे यांच्या हत्येचे पुरावे पुढे येणार?   

कोल्हापूर - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेले हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव ॲड. संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांचे गोविंद पानसरे यांच्या हत्येशी काही संदर्भ आहेत काय? याबाबतची चर्चा कोल्हापुरात सुरू झाली. पुनाळेकर आणि भावे यांच्यावर हत्येतील शस्त्रास्त्रे नष्ट केल्याचा आरोप आहे. पानसरे यांच्या हत्येतील काही शस्त्रांचा समावेश आहे काय, याबाबतची चर्चा होती.

दरम्यान, पानसरे यांच्या नातेवाइकांनीही हत्येतील शस्त्रास्त्रांबाबत पुढील माहिती उघड होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. याबाबत एसआयटीचे कोल्हापुरातील अधिकारी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तसेच सनातन संस्थेकडून कारवाई निषेधार्ह असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये साधर्म्य असल्यामुळे तपास न्यायालयाच्या देखरेखेखाली सुरू आहे. हत्येतील शस्त्रास्त्रे एकच असल्याची शक्‍यता यापूर्वीच पोलिसांनी त्या त्या वेळीच स्पष्ट केले आहे. आता शस्त्रे नष्ट करण्याच्या संशयाने ॲड. पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयने अटक केली आहे.

त्यामुळे त्यांच्याकडून पानसरे हत्येतील काही संदर्भ पुढे येणार काय ? पानसरे हत्येतील शस्त्रास्त्रे आणि हत्येसाठी वापरलेले वाहन अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. पोलिस तपास करत असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले आहे. त्यामुळे अटक केलेल्या ॲड. पुनाळेकर आणि भावे यांच्याकडून चौकशीदरम्यान पानसरे हत्येतील काही मुद्दे पुढे येणार काय, याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.

पानसरे हत्येप्रकरणी सर्वांत प्रथम अटक केलेल्या सनातनच्या समीर गायकवाडची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी स्वतः ॲड. पुनाळेकर आणि त्यांची टीम कोल्हापुरात आली होती. विचारवंतांच्या हत्येनंतर त्यांनी अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन त्यांची ठोस भूमिका मांडली होती आणि आता त्यांना स्वतःलाच अटक झाल्यामुळे त्यांचा या हत्येतील पुरावे नष्ट करण्यासाठी हात होता काय ? याची माहिती तपासात पुढे येण्याची शक्‍यता आहे. 

‘‘हत्येतील शस्त्रास्त्रे नष्ट केल्याचा आरोप ॲड. पुनाळेकर आणि भावे यांच्यावर आहे. सध्या तीनही हत्यांत साधर्म्य असल्याचे दिसून आले आहे. पानसरे हत्येतील शस्त्र आणि वाहने अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अटकेमुळे लवकरच तपास यंत्रणेकडूनही पानसरे हत्येतील शस्त्रे आणि वाहने यांबाबतची माहिती पुढे येईल, अशी आम्ही आशा बाळगतो.’’

- मेघा पानसरे

दरम्यान सनातन संस्थेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावेंना केलेली अटक निषेधार्ह आहे. केंद्रात हिंदुत्ववादी शासन सत्तारूढ असताना पुनाळेकर आणि भावे यांना अटक होण्यामागे षड्‌यंत्र आहे. सनातन संस्थेवर दबाव आणण्याच्या पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे. मालेगाव स्फोटप्रकरणी भगवा आतंकवादाचा खोटेपणा ज्यांनी सिद्ध केला, ज्यांनी समाजाच्या हितासाठी अनेक याचिका केल्या, त्या अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करणे गंभीर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com