समीर गायकवाडला सशर्त जामीन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर चौघांनी दोन पिस्तुलातून गोळ्या झाडल्याचा युक्तिवाद निंबाळकर यांनी शुक्रवारी केला होता.

जिल्ह्यात येण्यास बंदी ः प्रत्येक रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील पहिला संशयित आणि सनातनचा साधक समीर विष्णू गायकवाड याला आज सशर्त जामीन मंजूर झाेला. तब्बल एक वर्ष नऊ महिन्यांनंतर तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी २५ हजारांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. प्रत्येक रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी, कोल्हापूर जिल्हा बंदी, वास्तव्याचे ठिकाण न्यायालयाला कळविणे, अशा अटी घालून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

आठवड्यापूर्वी समीरच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायाधीश बिले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली होती. तेथे समीरचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकरआणि समीर पटवर्धन यांनी जोरदार युक्तिवाद करून त्याची बाजू मांडली होती. तब्बल साडेचार तास युक्तिवाद झाला होता. सर्वोच्च न्यायालयाचे काही दाखले देऊन त्यांनी समीर गायकवाडचा प्रत्यक्ष हत्येशी संबंध नसल्याचे ठामपणे सांगितले होते. दाखल झालेल्या दोन्ही दोषारोपपत्रांतूनही समीर थेट आरोपी आहे की नाही, हे स्पष्ट होत नाही. समीरने गोळ्या घातल्या नाहीत, तो आरोपी नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला होता. यानंतर काल सरकारी पक्षातर्फे ॲड. हर्षद निंबाळकर आणि ॲड. शिवाजीराव राणे यांनी युक्तिवाद केला होता. 

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे सकाळी फिरायला गेले असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. पानसरे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यानंतर १६ सप्टेंबर २०१५ ला समीर गायकवाड याला कोल्हापूर पोलिसांनी सांगलीतून अटक केली. तपासात तो सनातनचा साधक असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्याला पोलिस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत समीर कळंबा मध्यवर्ती कारागृहातील अंडाबरॅकमध्ये होता. समीरने २१ नोव्हेंबर २०१५ ला पोलिसांवर आरोप केले. ‘ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्टला होकार दे, आम्ही जी नावे देतो, ती त्यात सांग; त्यासाठी २५ लाख रुपये देतो आणि माफीचा साक्षीदार करतो,’ आदी गंभीर आरोपांचा त्यात समावेश होता. त्याच्या जामिनासाठी त्याच्या वकिलांनी यापूर्वी दोन वेळेला जिल्हा न्यायालयात तर एकदा उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता; मात्र ते अर्ज न्यायालयाने फेटाळले होते. जामीन मंजूर व्हावा, यासाठी त्याच्या वकिलांनी तिसऱ्यांदा जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज केला होता. काल दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. 

आजच्या सुनावणीवेळी समीरला न्यायालयात हजर ठेवण्याचे आदेश यापूर्वीच न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले होते. त्यानुसार सकाळी अकराच्या सुमारासच समीरला पोलिसांनी न्यायालयात आणले होते. न्यायाधीशांनी दुपारी एकला समीरला न्यायालयात बोलवून घेतले. सादर केलेल्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला असून २५ हजारांच्या जातमुचलक्‍यावर सशर्त जामीन मंजूर केल्याचे त्याला सांगितले. त्यानंतर अटीही सांगितल्या. या वेळी तपास यंत्रणेचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. समीरचे वकीलही उपस्थित नव्हते. समीरच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने याची माहिती समीरचे वकील समीर पटवर्धन यांना दिली. यानंतर न्यायालयीन कागदपत्रांची पूर्तता करून समीरला कारागृहाबाहेर काढण्याच्या हालचाली वकिलांनी सुरू केल्या. मात्र न्यायालयीन वेळेत ही पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे समीर सोमवारीच कारागृहाबाहेर येऊ शकेल, असे ॲड. समीर पटवर्धन यांनी सांगितले. न्यायालयाने याबाबतची पुढील सुनावणी १७ जुलैला ठेवली आहे. 

जामिनासाठीच्या अटी :
२५ हजारांचे दोन जातमुचलक्‍यांवर जामीन
प्रत्येक रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ‘एसआयटी’च्या कार्यालयात हजेरी बंधनकारक
न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश नाही
राहण्याचा पत्ता तपास यंत्रणेला आणि न्यायालयाला कळवणे
पासपोर्ट असेल तर तो जमा करणे
महाराष्ट्राबाहेर जाता येणार नाही
फिर्यादीसह साक्षीदारांवर दबाव टाकायचा नाही
कायदा-सुव्यवस्था बिघडेल, असे कृत्य करायचे नाही 

हे मुद्दे महत्त्वाचे ठरले
ओळख परेडमधील एका साक्षीदाराने दिलेल्या साक्षीत समीर गायकवाड हल्ल्यावेळी उपस्थित होता तर दुसऱ्या साक्षीदाराने दिलेल्या साक्षीमध्ये पानसरे यांच्यावर विनय पवार व सारंग आकोळकर यांनी हल्ला केल्याचे म्हटले आहे. या दोन्ही साक्षीमध्ये असणारी तफावत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीला अटक केल्यानंतर दोन वर्षांच्या आत त्याच्यावरील खटले सुरू झाले पाहिजेत. समीरला अटक करून १ वर्षे ९ महिने झाले होते. पुढील तीन महिन्यांत हा खटला सुरू होईल, असे दिसत नाही. गुन्ह्यातील ठोस पुरावे अद्याप तपास यंत्रणेच्या हाती नाहीत. तसेच तपासाला आमचा विरोध नाही. तो कितीही दिवस पुढे चालू राहू दे. हे चार मुद्दे समीरच्या जामीन अर्जासाठी महत्त्वाचे ठरल्याचे त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी सांगितले. 

श्रीरामचा जयघोष
समीर गायकवाडला जामीन मंजूर झाल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी एकमेकांच्या कपाळावर टिळा लावून ‘श्रीराम...’चा जयघोष केला. 

मतदान ओळखपत्र, आधारकार्ड जमा करणार
समीर गायकवाडचा पत्ता न्यायालयात देण्यासाठी त्याचे मतदान ओळखपत्र आणि आधारकार्ड न्यायालयात जमा करण्यात येणार असल्याचे समीरचे वकील समीर पटवर्धन यांनी सांगितले. 

उच्च न्यायालयात अपील
न्यायालयाने समीर गायकवाडला मंजूर केलेल्या जामीन आदेशाची प्रत मिळाल्यावर त्याची कारणे काय आहेत, हे पाहून उच्च न्यायालयात  अपील केले जाईल. तपासात पिस्तूल, मोटारसायकल असे महत्त्वाचे पुरावे हाती लागलेले नाहीत. दोघा संशयितांचा शोध सुरू आहे, असे ‘एसआयटी’चे प्रमुख संजीवकुमार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

घटनाक्रम -
१६ फेब्रुवारी २०१५ - गोविंद पानसरे व उमा पानसरे यांच्यावर गोळीबार
२० फेब्रुवारीस - पानसरे यांना दुपारी मुंबईला उपचारासाठी हलविले. त्याच सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये निधन 
२४ फेब्रुवारीस - मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास गृह विभागातर्फे २५ लाखांचे बक्षीस जाहीर
२३ एप्रिल - अतिरिक्त पोलिस महासंचालक संजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना
८ मे - उमा पानसरे यांचा जबाब नोंदविला
६ जून - पोलिसांकडून संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध
१६ सप्टेंबर - समीर गायकवाडला अटक
७ ऑक्‍टोबर - कळंबा जेलमध्ये ओळख परेड
९ ऑक्‍टोबर - समीरचा ब्रेन मॅपिंगला नकार
२१ नोव्हेंबर - पोलिसांनी २५ लाख रुपयांची ऑफर दिल्याचा समीरचा गौप्यस्फोट
१४ डिसेंबर - समीरविरोधात ३९२ पानांचे दोषारोपपत्र दाखल; खून, खुनाच्या प्रयत्नासह कट रचल्याचा आरोप. 
१६ जानेवारी २०१६ - समीरचा जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज
२२ जानेवारी - विशेष सरकारी वकिलांची पानसरे कुटुंबीयांकडून मागणी
२५ जानेवारी - हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
२३ मार्च - समीरचा जिल्हा न्यायालयात जामीनसाठी दुसरा अर्ज
७ सप्टेंबर - समीरचा उच्च न्यायालयात जामीनसाठी अर्ज

जिल्हा न्यायालयात समीरचा जामीन अर्ज मंजूर झाला, त्याबद्दल आम्ही नाराज आहोत. आता तो पळून जाऊ शकतो किंवा त्याच्याकडून साक्षीदारांवर दबाव टाकला जाऊ शकतो. या निर्णयाविरोधात सरकार पक्षातर्फे उच्च न्यायालयात तपास यंत्रणेने लगेच आव्हान याचिका दाखल करावी. या गुन्ह्यातील दोन संशयित फरार आरोपींना त्वरित अटक करावी, त्याशिवाय खटल्याचे काम सुरू होणार नाही. 
- मेघा पानसरे (गोविंद पानसरे यांच्या स्नुषा) 

समीर गायकवाडला जामीन मंजूर झाला आहे. त्याविरोधात उच्च न्यायालयात सरकार पक्षातर्फे आव्हान याचिका लवकरच दाखल करण्यात येईल. 
- ॲड. शिवाजीराव राणे (विशेष सरकारी वकील)

सनातन संस्थेच्या साधकाने हा गुन्हा केलेला नाही, हे आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहोत. ते समीरला मंजूर झालेल्या जामिनावरून सिद्ध झाले आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास आहे. तो आज सार्थकी लागला. 
- ॲड. समीर पटवर्धन (समीर गायकवाडचे वकील) 

Web Title: Govind Pansare murder case: Sameer Gaikwad gets bail by Kolhapur Court