पानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)  औरंगाबादमधून एका संशयिताला अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपीने दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या, असा संशय ‘सीबीआय’ला आहे.

कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)  औरंगाबादमधून एका संशयिताला अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपीने दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या, असा संशय ‘सीबीआय’ला आहे. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व डॉ. दाभोलकर या दोघांची हत्या एकाच पिस्तूलातून झाली असल्याचा प्राथमिक अहवाल तपास यंत्रणांनी न्यायालयात सादर केला होता. त्यामुळे आता पानसरे हत्येच्या तपासालाही गती मिळेल, असा विश्‍वास पानसरे कुटुंबीयांनी व्यक्त केला. 

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने संशयित समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्र तावडे यांना यापूर्वीच अटक केली आहे. आणखी दोघांचा शोध सुरू आहे. गुन्ह्यामधील वापरलेले शस्त्र, वाहन यांचाही पोलिस शोध घेत आहेत. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांची हत्या एकाच विचाराच्या व्यक्तींनी एकाच पिस्तुलाने केला असल्याचा प्राथमिक अहवाल तपास यंत्रणांनी न्यायालयात सादर केला आहे.

दरम्यान, ‘सीबीआय’ने औरंगाबादमधून आणखी एका संशयिताला डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. या संशयितानेच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय ‘सीबीआय’ला आहे. ‘सीबीआय’चा संशय खरा ठरल्यास पानसरेंच्या मारेकऱ्यांबाबत ठोस पुरावे तपासयंत्रणेच्या हाती लागण्याची शक्‍यता आहे. तसेच, गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, वाहनासह आणखी पुरावे तपास यंत्रणांच्या हाती येण्यास मदत होईल. त्यामुळे ‘सीबीआय’ने केलेल्या कारवाईने पानसरे हत्येच्या तपासालाही गती मिळेल, अशी आशा पानसरे कुटुंबीयांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येचा तपास सखोल आणि गतीने सुरू आहे. त्याच आधारे पानसरे हत्येतील धागेदोरे व ठोस पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे पानसरे हत्येचा तपास पूर्ण होऊन मारेकऱ्यांना शोधण्यात लवकरच यश मिळेल, अशी आशा पल्लवित झाली आहे. 
- मेघा पानसरे

Web Title: Govind Pansare Murder investigation