आता जीपीएस एम्प्लॉई ट्रॅकिंग यंत्रणा

आता जीपीएस एम्प्लॉई ट्रॅकिंग यंत्रणा

कोल्हापूर - महापालिकेचा कामगार कामावर आहे की नाही हे पाहणे तर सोडाच; पण तो प्रत्यक्ष या क्षणी काय काम करत आहे; हे पाहता येणारी जीपीएस एम्प्लॉई ट्रॅकिंग यंत्रणा महापालिकेत कार्यान्वित होणार आहे.

महापालिका संगणक विभागाने यासंदर्भातला प्रस्ताव आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे पाठवला आहे. ही यंत्रणा म्हणजे एक ॲपच आहे. ते सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाइलमध्ये डाऊन लोड करून घ्यावे लागणार आहे. फक्त कामाच्या वेळेत संबंधित कर्मचारी कामावर आहे की नाही व तो प्रत्यक्ष काय काम करतो आहे, दिवसअखेरीस काम कोणत्या टप्प्यावर आहे, हे या यंत्रणेद्वारे संबंधित कर्मचाऱ्याच्या सुपरवायझरला पाहता येणार आहे.

पहिल्या टप्प्यात सफाई, आरोग्य, बांधकाम, अतिक्रमण निर्मूलन, वर्कशॉप, पाणीपुरवठा, उद्यान, विद्युत, अग्निशामक, रुग्णवाहिका, शववाहिका या विभागातील कर्मचाऱ्यांना ही यंत्रणा लागू होणार आहे. या यंत्रणेची रचना खूप सुलभ आहे. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी ड्रेनेज सफाईचे काम चालू आहे. तेथे पहाटेच मुकादम व कर्मचाऱ्यांचे पथक गेल्याची नोंद आहे व सुपरवायझरला काम सुरू झाले आहे की नाही, याची खात्री करायची असेल; तर तो त्या कामावरील एकाद्या कर्मचाऱ्याला फोन करू शकतो. अशा वेळी संबंधित कर्मचारी मोबाइलला लोड केलेल्या यंत्रणेद्वारे केवळ बोलू शकतो असे नव्हे; तर कामावरच्या ठिकाणचा फोटो सुपरवायझर बघू शकतो. जे कामगार नेमून दिलेल्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतात, त्यांना या यंत्रणेची भीती बाळगण्याचे कारण नाही. पण तेथून आपली खासगी कामे करण्यास जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर या यंत्रणेमुळे नियंत्रण ठेवता येणार आहे. एवढेच नव्हे तर ठराविक वेळेनंतर काम किती झाले, हे देखील या यंत्रणेद्वारे पाहता येणार आहे. 

महापालिकेत ७० टक्के कर्मचारी प्रामाणिक आहेत; पण ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे, उद्धट बोलण्यामुळे महापालिकेच्या वाट्याला बदनामी येत आहे. केएमसी वर्कशॉपमध्ये तर ड्युटी संपायची वेळ आली तरी त्याच्या हाताला काळे लागलेले नसते, असे काही कर्मचारी आहेत. दुपारी घरी जेवायला जाणारे व तीननंतर झोप काढून येणारेही आहेत. या पार्श्‍वभूमीवर ही यंत्रणा कामचुकार कर्मचाऱ्यांसाठी परिणामकारक असणार आहे. 

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी महापालिकेच्या सर्व वाहनांना सहा महिन्यांपूर्वी जीपीएस यंत्रणा बसवली आहे. त्याचा परिणाम खूप चांगला झाला आहे. पेट्रोल व डिझेलच्या खर्चात मोठी बचत झाली आहे. वाहनांचा गैरवापर थांबला आहे. 

कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणारी ही यंत्रणा बसण्याची कुणकुण लागल्यावर कर्मचाऱ्यांत उलटसुलट चर्चा आहे. पण प्रामाणिक कर्मचाऱ्यांतून स्वागत आहे. काही जण मात्र व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करून विरोध करण्याच्या तयारीत आहेत.

सुपरवायझरांना माहिती मिळणार
एखाद्याचे काम सकाळी १० ते सायंकाळी ६ असेल तर त्याच वेळेत या यंत्रणेचा वापर होणार आहे. कामावर येण्यापूर्वी किंवा कर्मचारी काम संपवून घरी गेल्यावर तो काय करतो, कोठे आहे याची माहिती सुपरवायझर या यंत्रणेकडून घेऊ शकणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com