प्रवासी वाहनांना आता ‘जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम’

प्रवासी वाहनांना आता ‘जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम’

सातारा - प्रवाशांच्या प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रवासी वाहतूक वाहनांना ‘जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम’, तसेच ‘एमर्जन्सी अलार्म’ बसविण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे एक एप्रिलपासून या सुविधा नसलेल्या वाहनांचे पासिंग उपप्रादेशिक परिवहन विभागाने बंद केले आहे. बस व टॅक्‍सी अशी एकत्रित सुमारे सहा हजार प्रवासी वाहने जिल्ह्यात आहेत.

प्रवासी वाहनांमधून जाणाऱ्या प्रवाशांच्याबाबतीत अनेक गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. रात्री, अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांना लुबाडने, बलात्कार किंवा छेडछाडीचे प्रकारही झालेले आहेत. प्रवासी म्हणून बसायचे आणि वाहनचालक व अन्य प्रवाशांना लुबाडल्याच्याही घटना आहेत. अशा परिस्थितीत वाहनाचा शोध लागत नसल्याने पोलिसांना संकटात सापडलेल्यांना मदत करता येत नाही, तसेच वाहनात असलेल्यांना पोलिसांची मदत मागण्याचे साधनही नसते. 

या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिवहन विभागाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये नवीन प्रणाली बसविणे बंधनकारक केले आहे. ‘जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम’च्या आधारे वाहन अथवा कोणतीही वस्तू कुठे आहे? कुठून कुठे चालली आहे? हे समजते. त्यामुळे तिचा शोध घेणे सोपे होते. अशी ‘जीपीएस ट्रॅकिंग’ सर्व प्रवासी वाहनांमध्ये बसविणे बंधनकार करण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या वाहनामध्ये गुन्हा झाल्यास किंवा ते वाहन चोरी झाल्यास त्याचा तातडीने शोध घेणे शक्‍य होणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वाहनामध्ये ‘एमर्जन्सी अलार्म’ बसविणेही बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवाशाला सहज उपलब्ध होईल, अशा ठिकाणी या ‘अलार्म’चे बटन बसविणे आवश्‍यक आहे. त्यामुळे संकटाची चाहूल लागल्यास प्रवासी हे बटण दाबू शकतो. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना समजेल अशा पद्धतीची यंत्रणा त्यामध्ये असणार आहे. या दोन्ही गोष्टी सुरक्षित प्रवासासाठी उपयुक्त ठरणार आहेत.  त्यामुळे प्रवासी वाहनांमध्ये त्या बसविण्याबाबत परिवहन विभागाने नोव्हेंबर २०१६ मध्ये याबाबतचे परिपत्रक काढले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नव्हती. या वर्षी परिवहन विभागाने याची काटेकोट अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक एप्रिलपासून या सुविधा असल्याशिवाय प्रवासी वाहनांचे पासिंग बंद करण्यात आले आहे. 

शासनाने आदेश काढला, पासिंग थांबले. मात्र, ही यंत्रणा बसविण्याची सुविधा अद्याप जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही. त्याचबरोबर या यंत्रणेचा खर्च नेमका किती येणार? याची माहितीही कोणाला नाही. त्यामुळे पासिंगची तारीख जवळ आलेल्या वाहनधारकांची चिंता वाढली आहे. नियमांची अंमलबाजवणी करण्यापूर्वी त्यासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधांचाही शासनाने आढावा घेणे आवश्‍यक असल्याचे वाहनधारक म्हणत आहेत. साताऱ्यात अधिच ‘टेस्टिंग ट्रॅक’अभावी पासिंग बंद होते, आता त्यासाठी कऱ्हाडला जाण्याचा आर्थिक भुर्दंड पडत आहे. त्यात आता नवीन यंत्रणेसाठी खर्च येणार असल्याने वाहनधारक चिंतेत आहेत.

‘जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम’ व ‘एमर्जन्सी अलार्म’ बसविणे बंधनकारक आहे. त्याशिवाय प्रवासी वाहनांचे पासिंग करता येणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनधारकांनी ती बसवावी. ही यंत्रणा बसविण्याची सुविधा साताऱ्यात सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- संजय धायगुडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com