खेळाडूंच्या ग्रेस दहा गुणांचा प्रश्‍न गुलदस्त्यातच...!

खेळाडूंच्या ग्रेस दहा गुणांचा प्रश्‍न गुलदस्त्यातच...!

कोल्हापूर - राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांना दहा गुणांची सवलत दिली जात असली, तरी शिवाजी विद्यापीठाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना त्याचा लाभ मिळत नाही. सराव, शिबिरे आणि अभ्यास यांचा मेळ साधताना खेळाडूंची कसरत होते. तरीही त्यांना दहा ग्रेस गुण देण्यासाठी आवश्‍यक निर्णय झालेले नाहीत. त्यामुळे ग्रेस गुणांची दखल घेण्यास विद्यापीठाला कधी सवड मिळणार, याचे उत्तर तूर्त तरी गुलदस्त्यात आहे. 

३९ क्रीडा प्रकारांत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील खेळाडू सहभागी होतात. त्यांची संख्या साडेतीनशेच्या घरात जाते. त्यांना वर्षभर विविध स्पर्धांच्या निमित्ताने बाहेरगावी जावे लागते. महाविद्यालयात असतील तर दिवसातील सहा ते सात तास सराव करावा लागतो. तसेच जर शिबिर असेल, तर दहा दिवस विद्यापीठात यावे लागते. त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळतोच असे नाही. तरीही जमेल तसा अभ्यास करून ते उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात.

विद्यापीठाशी संलग्नित सुमारे २८० महाविद्यालये असून त्यातील अनुदानित १६० व विनाअनुदानित ३० महाविद्यालयांत एनएसएसचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांची ही संख्या २७ हजारांवर जाते. या विद्यार्थ्यांची विद्यापीठासह गावोगावी शिबिरे होतात. जो विद्यार्थी दोन वर्षे स्वयंसेवक म्हणून काम करतो व ज्याचे एक शिबिर झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना दहा गुण देण्याची तरतूद विद्यापीठाने २०१०-११मध्ये केली आहे. खेळाडूंना गुण द्यायचे असल्यास तसा ठराव बोर्ड ऑफ स्पोर्टस्‌ अँड फिजिकल कल्चरमध्ये व्हावा लागतो. व्यवस्थापन व विद्वत परिषदेत त्याला मान्यता मिळाल्यानंतर तो परीक्षा विभागाकडे पाठवावा लागतो. ही ठरावाबाबतची सर्वसाधारण प्रक्रिया आहे. असा ठराव विद्यापीठ स्तरावर झाला आहे का, तो कोणत्या टप्प्यात आहे, याविषयीची माहिती घेण्याचा प्रयत्न क्रीडा विभाग प्रमुख पी. टी. गायकवाड यांच्याशी केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

खेळाडूचे कष्ट काय असतात, हे खेळाडूच सांगू शकतो. त्याने मैदानावर घाम गाळला, तरच तो पदक मिळवू शकतो. मग त्याला गुण देण्यात अडचण कसली आहे? विद्यापीठस्तरीय खेळाडूंना गुण देण्यासाठी निकष ठरवावेत आणि गुण द्यावेत. 
 - प्रा. अमर सासने 

खेळाडूंना गुणांची सवलत मिळायलाच हवी. सराव आणि शिबिरांत त्यांचा अधिक वेळ जातो. त्यामुळे एनएसएसच्या विद्यार्थ्यांना गुण देण्याची तरतूद झाली पाहिजे. 
 - प्रा. विजय रोकडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com