कामास गती... अडचणीही तितक्‍याच! 

कामास गती... अडचणीही तितक्‍याच! 

सातारा - साताऱ्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय असलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम मध्यावर येऊन ठेपले आहे. पोवई नाक्‍यावर 580 मीटरचा रस्त्यांचा स्लॅब, तर 120 "ओपन टू स्काय' स्लॅब पूर्णत्वाला गेला आहे. मात्र, ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होण्यासाठी अद्यापही पुढील दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत सातारकरांचा पर्यायी रस्त्यांचा त्रास काही कमी होणार नाही. 

सातारा शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाक्‍यावर आठ रस्ते एकत्रित येतात. वाढलेल्या वाहनांमुळे तेथे सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सिग्नल कार्यान्वित असूनही अनेकदा वाहतूक कोंडीचे चित्र दिसत होते. ती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ग्रेड सेपरेटरचे काम सुरू केले आहे. त्यामुळे भुयारी मार्गाद्वारेही वाहतूक होणार असल्याने वाहन कोंडी टळली जाणार आहे. 

सध्या पोवई नाक्‍यावरील काम वेगाने सुरू असून, तेथून शिक्षक भवन, कासट मार्केटकडील रस्त्यावर भराव टाकून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. राजपथाच्या बाजूला गतीने काम सुरू असून, आयडीबीआय बॅंकेपर्यंत भुयारी मार्ग बनविला जात आहे. त्याशिवाय या रस्त्यावर इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज ते सयाजी हायस्कूलपर्यंत रस्त्याची खोदाई सुरू आहे. हा रस्त्या पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्णत्वाला नेऊन भुयारी मार्गाने वाहतूक सुरू करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार टी ऍण्ट टी कंपनीचा आहे. पोवई नाका परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाइपलाइन, वीज वितरण, बीएसएनएल, दूरसंचार कंपनीच्या लाइनचे जाळे असून, त्या काढण्याबाबत संबंधित विभागांची दिरंगाई होत आहे. परिणामी, ग्रेड सेपरेटरच्या कामांत अडथळे निर्माण होत आहेत. 

दरम्यान, या रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी पर्यायी रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र, हे रस्ते सुस्थितीत नाहीत, त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच काही पर्यायी रस्त्यांवर सांडपाणी येत असल्याने नागरिकांना कसरत करतच रस्ता ओलांडावा लागतो. 

...असा कराल भुयारी रस्त्यांत प्रवेश 
राजपथावरून लॉ कॉलेजपासून वाहने खाली उतरण्यास सुरवात होईल. या रस्त्यावर रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयापासून स्लॅब असणार आहे. कोरेगाव रस्त्यावर पंचायत समितीच्या प्रवेशद्वारापासून वाहने खाली उतरण्यास सुरवात होईल. डाक कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरून 60 मीटरचा स्लॅब सुरू होईल. कऱ्हाड रस्त्यावर पेंढारकर हॉस्पिटलसमोरील चौकातून खाली वाहने उतरतील, त्यावर गुलबहार हॉटेलसमोरील बाजूपासून 235 मीटरचा स्लॅब पडणार आहे. बस स्थानक मार्गावर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळून वाहने खाली उतरणार असून, जिल्हा बॅंकेच्या एमटीएमपासून भुयारी मार्गावर स्लॅब असणार आहे. 

कोण जाणार भुयारातून? 
- राजपथ, कास रस्ता : फक्‍त बस स्थानकाकडे जाणार 
- कोरेगाव रस्ता : फक्‍त बस स्थानकाकडून बाहेर पडणार 
- कऱ्हाड रस्ता : बस स्थानकाकडून येणार आणि जाणार 
- इतर रस्ते : सर्व वाहने वरून (ओपन टू स्काय स्लॅब) जातील 
- सेवा रस्ते : तिन्ही मार्गांवर दोन्ही बाजूला पाच मीटर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com