‘पदवीधर’ व ‘शिक्षक’ निवडणुकांचेही वेध

प्रवीण जाधव
बुधवार, 24 जुलै 2019

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस शह देणार?
विधानसभा निवडणुकांबरोबर भाजपने विधान परिषदेमध्येही आपले वर्चस्व वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याचे आता स्पष्ट होत आहे. भाजपच्या रणनीतीला राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस कसा शह देणार, हे आगामी काळात पाहावे लागणार आहे.

सातारा - विधानसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी बैठक करत रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.

विधानसभा निवडणुकीचे घुमशान जवळ आले आहे. येत्या दीड महिन्यात याबाबतची आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने नुकतीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यातूनच पश्‍चिम महाराष्ट्रावर या निवडणुकीमध्ये भाजपचे जास्त लक्ष केंद्रित होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्यादृष्टीने चंद्रकांत पाटील यांचे पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये दौरे सुरू आहेत. बूथपातळीवर पक्षाच्या बांधणीवर व त्याच्या सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. विधानसभा मतदारसंघाची तयारी सुरू असताना विधान परिषदेच्या मतदारसंघावरून मात्र, भाजपने लक्ष ढळू दिलेले नाही. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकाही येत्या काही महिन्यांमध्ये लागण्याची शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत या निवडणुकांवरील पकड ढिली होऊ नये याकडेही लक्ष दिले जात आहे.

चंद्रकांत पाटील स्वत: पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी प्रतिष्ठेचा असणार आहे. आजपर्यंत चंद्रकांत पाटील यांनी जनतेतून निवडणूक लढलेली नाही. यावेळी ते विधानसभा मतदारसंघात नशिब आजमावण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. चंद्रकांत पाटील पदवीधरमधून असले तरीही या ठिकाणी राष्ट्रवादीकडून यावेळी जोरदार ताकद लावली जावू शकते आणि ते उभे राहिले नाहीत तर, पुणे पदवीधर मतदारसंघात पक्षाला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत पक्षाला हा मतदारसंघ हातात राखायचा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी फार आधीपासून या मतदारसंघाच्या बांधणीकडे लक्ष दिले आहे. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. चंद्रकांत पाटील हे विधानसभेवर गेल्यास पदवीधरसाठी असलेल्या इच्छुकांमध्ये ते सर्वांत आघाडीवर असणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये त्यांनी मतदार नोंदणीची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली आहे. मागील काही महिन्यांमध्ये विविध सहकारी पतसंस्था, बॅंकांचे प्रतिनिधी या कामामध्ये गुंतल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत होते.

या दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये आता जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा समावेश करून घेऊन मतदार नोंदणीसह अन्य कार्यक्रम राबविणे, पक्षाची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोचविणे यासाठी काल पुण्यामध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये या दोन्ही 
मतदारसंघांबाबतची रणनीती आखण्यात आली आहे. त्यामध्ये या दोन्ही निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार विजयी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामध्ये साताऱ्यातील सर्वच मतदारसंघांतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समोवश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Graduate and teacher constituency election bjp politics