धान्याला कीड लागताच अलर्ट

सचिन देशमुख
शनिवार, 23 जून 2018

कऱ्हाड - साठवणूक केलेल्या ठिकाणी अथवा गोदामातील धान्याला कीड, वाळवी लागणे, धान्य सडण्याचे प्रकार सर्रास घडतात. अशा प्रकाराला आळा घालण्याच्यादृष्टीने येथील प्रा. डॉ. संजीव वाघ यांनी केलेले संशोधन उपयुक्त ठरणार आहे. धान्य, डाळींना कीड लागण्याची सुरवात होताच त्याची पूर्वसूचना गोदाम किपरसह प्रमुख अधिकाऱ्यांना मिळण्याच्या व्यवस्थेमुळे धान्याची नासाडी रोखणे शक्‍य होणार आहे. लवकरच या संशोधनास पेटंटही मिळेल, असा विश्‍वास डॉ. वाघ यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

अभ्यास व संशोधनासाठी जगभरातील अनेक देशांत फिरून आलेल्या येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञानचे विभागप्रमुख प्रा. डॉ. वाघ यांनी केलेले संशोधन शेती व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. अनेक शेतकरी शेतातून पिकवलेले धान्य, डाळींची साठवण करून ठेवतात.

व्यापाऱ्यांच्या तसेच शासकीय गोदामातही धान्याचा साठा मोठ्या प्रमाणात असतो. मात्र, त्याच्या संरक्षणाची व्यवस्था नसल्याने गोदामात राहिलेल्या धान्याला कीड, वाळवी लागणे, धान्य सडण्याचे प्रकार घडतात. त्यातून शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. मात्र, त्यावर उपाययोजनाच नसल्याने व्यापारी, गोदाम व्यवस्थापकाकडे पर्याय नव्हता.

मात्र, प्रा. डॉ. वाघ यांनी त्यावर संशोधन करत सेन्सरच्या साह्याने साठवणूक केलेल्या ठिकाणी धान्य, डाळींना कीड लागताना त्यात होणाऱ्या केमिकल बदलाची नोंद सेन्सर घेत असल्याने कीडीला सुरवात होताच त्याची पूर्वसूचना गोदाम व्यवस्थापकाला मिळणे शक्‍य होणार आहे. त्याबाबत तंत्रज्ञानाची जोड देवून गोदाम व्यवस्थापकासह अन्य काहींच्या मोबाईलवर तशी पूर्वसूचना देणारा संदेश मिळाल्यावर पुढील उपाययोजना करणे शक्‍य आहे. या संशोधनात सेन्सरची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळेच धान्याला कीड, वाळवी लागण्यास सुरवात झाल्यावर सेन्सरद्वारे त्याचा संदेश मिळणे सहज शक्‍य होते. दिवसातून एकदा, दोनदा याप्रमाणे त्याला निर्देशित करेल त्यानुसार धान्याची स्थिती मोबाईलवर दाखवू शकेल. या संशोधनाचा प्रत्यक्षात वापर झाल्यावर मोठ्या प्रमाणात धान्याचे होणारे नुकसान रोखण्यास मदत होऊ शकते. हे संशोधन करणाऱ्या प्रा. डॉ. वाघ यांचे संशोधनाला पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

Web Title: grains pest alert