ग्रामपंचायत निवडणूक ; परगावच्या मतदारासाठी "फिल्डिंग' 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

परगावची मतांसाठी आठ दिवस कार्यकर्त्यांनी शोध मोहीम राबवली आहे.

सांगली - जिल्ह्यातील 141 ग्रामपंचायत निवडणुक मतदानासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. अनेक गावांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. अटीतटीच्या लढतीत उमेदवारांचे लक्ष प्रत्येक मतदारांकडे आहे. परगावच्या मतदारांवर उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी कार्यकर्त्यांची विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पुणे-मुंबई येथील मतदारासाठी खासगी वाहनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील 141 ग्रामपंयचायतींसाठी प्रचार यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. गट, गट, भावकी शिवाय परगावच्या मतदारांवर विशेष लक्ष आहे. गावागावातील वातावरण प्रचाराने दणाणून गेले आहे. उमेदवार व कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागातील गल्लीबोळ, वाडी-वस्त्या पिंजून काढला आहे. प्रत्येक उमेदवारासाठी कार्यकर्त्यांची फौज रात्रीचा दिवस करीत आहेत. प्रत्येक प्रभागात एकेका मतदाराला लाख मोलाचा भाव आला आहे. त्यासाठी उमेदवारांनी परगावच्या मतदारावर लक्ष केंद्रित करून विशेष यंत्रणा राबवली आहे. 

प्रत्येक प्रभागात दोन आघाड्यांचे प्रत्येकी दोन या प्रमाणे चार आणि एखाद्या दुसरा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांनीच परगावच्या मतदाराकडे अधिक लक्ष दिले आहे. नोकरी, व्यवसाय, आणि बदलीमुळे अनेक मतदार परगावी आहेत. शिक्षणासाठीही परगावी असणाऱ्या युवा मतदारांची संख्या अधिक आहे. विशेषतः अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, व्यवसाय शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सर्वाधिक मतदार पुणे मुंबईला आहेत. प्रत्येक प्रभागात किमान शंभरहून अधिक मतदार परगावी आहेत. चुरशीच्या निवडणुकीत विजयाचे मताधिक्‍य अत्यल्प राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच परगावच्या मतांना सर्वाधिक महत्त्व आहे. 

परगावची मतांसाठी आठ दिवस कार्यकर्त्यांनी शोध मोहीम राबवली आहे. संबंधित मतदारांच्या नातेवाइकांकडून त्यांना संपर्क साधला आहे. प्रत्येक उमेदवाराने देखील स्वतः दूरध्वनी करून मतदानासाठी येण्याची विनंती केली आहे. चुरशीच्या निवडणुकीत आपले मत अनमोल असल्याचे सांगून मतदानासाठी आग्रह धरला आहे. त्यासाठी विशेष वाहने तर काही ठिकाणी सबंधितांनाच स्वतःची किंवा भाड्याने वाहन आणावे असे सांगितले आहे. दोन्ही वेळच्या प्रवास खर्चासह जेवण, नाष्ट्याची सोय केली आहे. पुणे-मुंबईतील पाचहून अधिक मतदारांना अथवा मतदारांना गटाने खासगी गाडीत आणण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपल्या खास विश्‍वासू कार्यकर्त्यांवर याची जबाबदारी दिली आहे. एकंदरीत परगावचे मतदार आणण्यासाठी उमेदवारात अनोखी चढाओढ सुरू आहे. 

हे पण वाचा -  धक्कादायक : गुंगीचे औषध देऊन डांबले अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन गर्भवतीवर केले आत्याचार

 

मेसेजचा पाऊस 
सर्व उमेदवारांनी प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात सोशल मीडियाचा आधार मोठा घेतला आहे. प्रत्येक मतदाराला वॉट्‌सऍप, मेसेजद्वारे मतदानासाठी विनंती करण्यात येत आहे. त्यासाठी गेले दोन दिवसापासून सर्वच उमेदवारांनी आपापल्या मतदारांना मोबाइलवर मेसेज सोडले आहेत. त्यामुळेच मेसेजचा पाऊस सुरू झाला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat elections Fielding voters