ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात एक हजार 29 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या आकृतिबंधातील कर्मचाऱ्यांची संख्या दोन हजारच्या वर आहे.

सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषदेच्या प्रवेशदारासमोर धरणे आंदोलन केले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. 

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात एक हजार 29 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या आकृतिबंधातील कर्मचाऱ्यांची संख्या दोन हजारच्या वर आहे. या कर्मचाऱ्यांना गेल्या 10 ते 12 महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. तसेच फंड, राहणीमान भत्ता व त्यावरील मागील फरक, सेवापुस्तके, इतर सेवा विषयक बाबी जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवल्या जात आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अनुदान ऑनलाइन करण्यात येणार असल्याचा सहा जानेवारी 2018 ला शासनाने निर्णय घेतला आहे. तेव्हापासून ग्रामपंचायतीने वेतन देणे थांबवले आहे. 

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी नियमित बैठका व्हायला हव्यात, कर्मचाऱ्यांकडून स्ट्रीट लाईटची कामे करवून घेऊ नये, कर्मचाऱ्यांना पुरस्कार द्यावा, विमा उतरावा, कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर व्हावा, येवती (ता. मोहोळ) येथील कर्मचाऱ्याच्या सेवाविषयक बाबी पूर्ण कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस सुरेश राठोड, वसंत माने-पाटील, भारत कोळपे, अरुण सुर्वे, मसुदेव रणदिवे, गुरुबा भोसले, धनाजी पांढरे, संजय मगर, विलास गव्हाणे, रामचंद्र गरड, बसवराज कोळी, दिनकर खंडागळे, विनोद चव्हाण उपस्थित होते. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Gram Panchayat workers dharane agitation at solapur