समाजमनातील प्रश्‍न शासनाला विचारण्याची गरज 

समाजमनातील प्रश्‍न शासनाला विचारण्याची गरज 

दानोळी : ''साहित्याची प्रेरणा पुस्तकात नसते, ती जिवंत माणसात असते. समाजातून साहित्यिक प्रेरणा घेत असतो. प्रत्येक लेखकाची प्रेरणा वेगळी असते. लेखक अव्यक्त प्रश्‍न, अन्याय, व्यथा समाजाच्या कोर्टात मांडत असतो. लेखक बऱ्याचदा आपले म्हणणे विविध पात्रांमधून मांडत असतो. सध्या मात्र लेखकांनी व्यथा मांडणे अवघड झाले आहे. लेखकाच्या स्वातंत्र्याच्या, अभिव्यक्तीचा विचार व्हायला हवा.

समाजमनातील प्रश्‍न शासन व्यवस्थेला विचारण्याची गरज आहे,'' असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. मोहन पाटील यांनी केले. 

ते निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे साहित्य सुधा कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंच व ग्रामस्थांतर्फे आयोजित 20 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 

दरम्यान सकाळी ग्रंथदिडीने संमेलनाची सुरवात झाली. महादेव मंदिरामध्ये डॉ. सुकुमार मगदूम, डॉ. धवल पाटील, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, अनिल बागणे, डॉ. शीतल पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीला सुरवात झाली. 

पद्माकर पाटील यांनी स्वागत केले. शांताराम कांबळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर संमेलनाचे उद्‌घाटन पणन व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाले. जयसिंगपूच्या नूतन नगराध्यक्षा डॉ. सौ. नीता माने व मान्यवरांच्या हस्ते 'साहित्य सुधा' या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. सुरेश शिपूरकर यांना समाजरत्न, विजय चोरमारे यांना साहित्यरत्न, चवगोंडा पाटील-सकाप्पा यांना शेतकरी राजा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

सदाभाऊ खोत म्हणाले, ''साहित्य जीवनाचा दिशादर्शक यंत्र आहे. साहित्यामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते. किती पेक्षा काय शिकले याला महत्त्व आहे. पदव्या या फोटोत लावण्यासाठी राहतात. विचार हे फोटोत नाहीतर समाजात प्रकट होतात. बौद्धिक, मौखिक विचारांचा काळ संपला आहे. आता ऐकिव विचारांचा काळ आला आहे. त्यामुळे विचारांचा प्रवाह खुंटला की काय, असा प्रश्‍न पडला आहे.'' 

स्वागताध्यक्ष अनिल बागणे म्हणाले, ''शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करताना गुणवत्ता असतानाही केवळ परिस्थितीअभावी वंचित राहण्याच्या मार्गावर असलेल्यांना आधार देण्याची शिकवण मराठी साहित्याने मला दिली. डिजिटल युगातील तंत्रज्ञान पैसे मिळविण्यास, जीवन सुखकर करण्यास उपयोगी पडते; मात्र जीवनाचा खरा आनंद मिळण्यासाठी साहित्याशिवाय दुसरा पर्याय नाही.'' आमदार उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

प्राचार्य श्रीधर हेरवाडे, प्रा. विजय मगदूम, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे, सरपंच बनाबाई कांबळे, उपसरपंच नेमगोंडा पाटील, विजय बेळंके, डॉ. महावीर अक्कोळे, भगवान कांबळे, प्रा. शांताराम कांबळे, अजित सुतार, गोमटेश पाटील उपस्थित होते. संगीता पाटील, नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रावसाहेब पुजारी यांनी आभार मानले. 

दुपारच्या सत्रात प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. 'नोटाबंदी : अर्थकारण की राजकारण' या विषयावर साहित्यिक कृष्णा खोत पाटील यांनी परखड मत व्यक्त केले. कथाकार आप्पासाहेब खोत यांनी 'कोंबडी' व 'गवनेर' या कथा सादर केल्या. अल्लाबक्ष चिक्कोडे उपस्थित होते. सायंकाळी डॉ. चंद्रकांत ऊर्फ राजू पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यामध्ये निमंत्रित व नवकवींनी कविता सादर केल्या. 

आनंद यादव, पाटील यांना श्रद्धांजली 
साहित्यिक आनंद यादव, मंचचे माजी अध्यक्ष डॉ. जे. ए. पाटील, देशभरातील साहित्यिक, सैनिक व मान्यवर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com