मागितला ढीग, मिळाला कण!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

सातारा - बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेच्या धोरणात ग्रामविकास विभागाने सुधारणा केली आहे. त्यामुळे पक्की किंवा हक्काची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी इमारत मिळणार आहे. वास्तविकता सातारा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत २८६ ग्रामपंचायतींसाठी इमारत मिळावी, अशी मागणी केली असताना केवळ सात इमारतींना मंजुरी मिळाली आहे. 

सातारा - बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेच्या धोरणात ग्रामविकास विभागाने सुधारणा केली आहे. त्यामुळे पक्की किंवा हक्काची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी इमारत मिळणार आहे. वास्तविकता सातारा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत २८६ ग्रामपंचायतींसाठी इमारत मिळावी, अशी मागणी केली असताना केवळ सात इमारतींना मंजुरी मिळाली आहे. 

राज्य सरकारने २३ जानेवारी २०१८ रोजी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एक हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना कार्यालय बांधण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेत कोणताही बदल केला नाही. यात सरकारने निश्‍चित केलेल्या १२ लाखांच्या मूल्यापैकी ९० टक्के रक्कम सरकारमार्फत दिली जाणार आहे. उर्वरित दहा टक्के रक्कम ग्रामपंचायतीला स्वनिधीतून खर्च करावी लागणार आहे. 

पूर्वीच्या निर्णयानुसार बांधकामासाठी सरकारने १८ लाख मूल्य निश्‍चित केले होते. आताही तेच कायम ठेवले आहे. मात्र, सरकारमार्फत यापूर्वी यातील ९० टक्के रक्कम दिली जात होती. आता नव्या निर्णयानुसार सरकारने या रकमेत कपात करून ८५ टक्के अर्थात १५ लाख ३० हजार रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी ग्रामपंचायतींना स्वनिधीतून दहा टक्के रक्कम गुंतवावी लागत होती. यात वाढ करून ती १५ टक्के अर्थात दोन लाख ७० हजार असणार आहे. तसेच, दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी कोणत्याही शासकीय अनुदानाविना त्यांच्या कार्यालयाचे बांधकाम स्वनिधीतून अथवा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या धर्तीवरच जिल्हा परिषदेची मान्यता घेऊन करावे, अशी अट यापूर्वी होती. 

आता मात्र ज्या ग्रामपंचायतींना हे शक्‍य नाही, अशा ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठीही सरकारने निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारने १८ लाख मूल्य निर्धारित केले आहे, त्यापैकी ८० टक्के निधी म्हणजेच १४ लाख ४० हजारांचा निधी सरकारमार्फत दिला जाणार आहे. उर्वरित २० टक्के म्हणजेच तीन लाख ६० हजार रुपये ग्रामपंचायतींना स्वनिधीतून या बांधकामावर खर्च करावे लागणार आहेत. योजनेला ११ महिने पूर्ण झाली असली तरी साताऱ्याच्या वाट्याला मात्र भक्‍कम निधी आला नाही. केवळ पाटणमधील सात व खटावमधील दोन ग्रामपंचायतींना या योजनेतून इमारत बांधकामासाठी निधी मिळाला आहे.

पाटणला सर्वाधिक ग्रामपंचायती
तालुकानिहाय स्वत:ची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अशी : सातारा ४६, कऱ्हाड ४२, पाटण ५२, खटाव आठ, माण १८, कोरेगाव १४, फलटण २०, खंडाळा तीन, जावळी ५०, वाई १२, महाबळेश्‍वर २१. 

Web Title: Grampanchyat Construction Scheme ZP