जिल्ह्यात 1247 सदस्यांवर अपात्रतेचे संकट

उमेश बांबरे
रविवार, 8 जानेवारी 2017

सातारा - निवडणूक खर्चाचा तपशील विहीत वेळेत सादर न करणे, जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याकडे दुर्लक्ष आणि अतिक्रमण, तीन आपत्ये, आर्थिक लाभ घेणे आदी कारणांनी जिल्ह्यातील एक हजार 247 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची तलवार आहे. आतापर्यंत 631 जणांवर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. केवळ जातपडताळणीचे प्रमाणपत्र न देणारे 616 सदस्य अपात्र ठरले आहेत.

सातारा - निवडणूक खर्चाचा तपशील विहीत वेळेत सादर न करणे, जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याकडे दुर्लक्ष आणि अतिक्रमण, तीन आपत्ये, आर्थिक लाभ घेणे आदी कारणांनी जिल्ह्यातील एक हजार 247 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची तलवार आहे. आतापर्यंत 631 जणांवर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. केवळ जातपडताळणीचे प्रमाणपत्र न देणारे 616 सदस्य अपात्र ठरले आहेत.

माण तालुक्‍यातून मात्र, एकही ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरलेला नाही.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर शासकीय सोपास्कर पूर्ण करण्याकडे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात. याचा परिणाम त्यांना कार्यकाल पूर्ण करण्याआधीच पदावरून दूर व्हावे लागत आहे. त्याबरोबरच आगामी पाच वर्षे संबंधित लोकप्रतिनिधी हा निवडणूक लढण्यास अपात्र ठरत आहे. हे नुकसान केवळ निवडणुकीसाठी केलेला खर्च वेळेत सादर न करणे, जातपडताळणी प्रमाणपत्र देण्याकडे दुर्लक्ष करणे, गाव व परिसरात शासकीय जागांवर अतिक्रमण करणे, तीन आपत्ये आणि लाभ घेण्याच्या हेतून ग्रामपंचायत स्तरावरील कामे स्वत:च घेणे या कारणांचा त्यामध्ये समावेश आहे. आतापर्यंत निवडणूक खर्च वेळेत न देण्यावरून 555 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र व्हावे लागले आहे, तर 76 सदस्यांना जातपडताळणीचे प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे अपात्र व्हावे लागले असून, एकूण 631 सदस्य आतापर्यंत अपात्र ठरले आहेत. आरक्षित जागेवर निवडून येताना उमेदवार आपल्या अर्जासोबत जातपडताळणीसाठी अर्ज दाखल केलेल्याची पावती जोडतात; पण प्रत्यक्षात प्रमाणपत्र सादर करण्याकडे दुर्लक्ष होते. अशा सुमारे 616 सदस्यांवर अपात्र होण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये सातारा तालुक्‍यातील 82, कऱ्हाडमधील 111, वाई तालुक्‍यातील 197, महाबळेश्‍वर तालुक्‍यातील 21 आणि खटाव तालुक्‍यातील 207 ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.

जातपडताळणीची सोय
जातपडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी यापूर्वी विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे अर्ज करावा लागत होता. त्यामुळे वेळेत प्रमाणपत्र मिळेल याची खात्री नव्हती; पण आता जिल्ह्यातच जातपडताळणी कार्यालय सुरू झाले आहे. त्यामुळे आरक्षित जागेवर लढण्यासाठी इच्छुकांची सोय झाली असली, तरी त्यांच्याकडून अशी प्रमाणपत्रे उपलब्ध करून ते निवडणूक शाखेत जमा करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

तालुकानिहाय अपात्र ठरलेले सदस्य
सातारा दहा, जावळी एक, कोरेगाव एक, कऱ्हाड 327, पाटण 16, वाई 108, महाबळेश्‍वर चार, खंडाळा 97, फलटण 36, खटाव 23.

Web Title: grampanchyat members disqualified crisis