पन्नास नातू-पणतुंसह खापरपंतुंनी साजरा केला पणजीचा वाढदिवस

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 11 डिसेंबर 2019

... आणि राधाआजी गहिवरल्या 
या कार्यक्रमामुळे आनंदी झालेल्या राधाबाई दुसऱ्या दिवशी मात्र फारच दुःखी झाल्या. जड अंतःकरणाने एकेक नातीला,पणतू,पणती ला निरोप देताना त्यांच्या हातात आपल्या चंचीतुन हाताला येईल तेवढे पैसे त्या देत राहिल्या. पुन्हा आपली भेट होईल की नाही असे म्हणत हातात पन्नास, शंभर रुपये ठेवताच त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. अशी पाखरे येती अन स्मृती ठेऊन जाती या कवितेच्या ओळींप्रमाणे जड अंतकरणानें सगळ्या नातवंडे-परतवंडे यांनी आपल्या आजी-पणजीचा निरोप घेतला. 

सोलापूर ः मुलांबरोबरच नातू,पणतू आणि खापर पणतुंच्या उपस्थितीत झालेल्या वाढदिवसामुळे 92 वर्षीय राधाबाई सिद्राम मादास यांना आपले आनंदाश्रु आवरता आले नाहीत. त्यांच्या वाढदिवसासाठी खास मुंबई, पुणे, नगर, हैद्राबाद, कोलकता, विजयवाडा, जालना, बेंगळुरू आदी ठिकाणी नोकरीसाठी गेलेली मुल, सासरी गेलेल्या मुलींसह नातू ,नाती,पणतू,पणती,खापर पणतू-पणतींनी आपल्या पणजीला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून हजेरी लावली. 

हे आवर्जून वाचा....  आजारी आजोबांचे नातवांसाठी काय पण
 

सर्वांनी केले औक्षण 
सुरवातीला सर्वांनी राधाबाईंचे औक्षण केले. त्यानंतर "हॅपी बर्थ डे टू यु'च्या जल्लोषात आजीसाठी आणलेला भला मोठा केक कापण्यात आला. ""झिंग झिंग झिंगाट..' च्या तालावर सर्व नातू पणतूनी नृत्य ही केले. नगर येथील वैभवी म्याना या नातीने भरतनाट्यम नृत्य सादर करीत आजीस शुभेच्छा दिल्या. पन्नास वर्षांपूर्वी उपजीविकेसाठी पुण्याहून सोलापुरात येऊन स्थायिक झालेले सिद्राम मादास व राधाबाई मादास कटुंबीय. सोलापुरातील वस्त्रोद्योगास पूरक असलेल्या गोपदोरी तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय. सिद्राम मादास यांना पाच मुली, दोन मुले, त्यांची मुले, नातू, नाती,पणतू, पणती, खापर पणतू असे एकूण 128 जणांचे कटुंब आहे. पाच मुली व दोन मुले यांच्यासह जवळपास पन्नास नातवंडे, परतवंडे यांनी एकत्र येत हा वाढदिवस साजरा केला. 

नातीने केले नियोजन 
मागील महिन्यात राधाबाई याना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयुष्यात पहिल्यांदाच त्या रुग्णालयात दाखल झालेल्या झालेल्या राधाबाईना याच ठिकाणी आपला शेवट होईल ही भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी मला माझ्या सर्व मुलींना,नातवंडांना, परातवंडाना एकदातरी भेटू द्या अशी विनवणी केली. नगरची नात जयश्री व सुनील म्याना यांनी आजींच्या या मागणीची पूर्तता करण्याचा दृढनिश्‍चय करून वेगवेगळ्या शहरात असलेल्या सर्व नातवंडे, परतवंडांशी संपर्क साधून वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. सर्वांच्या सोयीने रविवारचा दिवस ठरला. सर्व नातवंडे आजीकडे येईपर्यंत गुप्तता पाळली. पन्नास नातवंडे आल्यावर मात्र आजी भावनाविवश झाल्या. आजींसाठी कोणी साडी तर कोणी शाल, तर कोणी जपमाळ आणले. दिवसभर बालपणाच्या मधुर आठवणीना उधाण आले होते. भोजनावळी झाल्या, आजींच्या आठवणी रात्री उशिरापर्यंत ऐकण्यात तीनही पिढ्या रमून गेल्या होत्या.

चला पाहूयात व्हिडीअो....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The grandparents celebrated grand-grand mother birthday with fifty grandchildren