धुक्यामुळे द्राक्षपिकांसह शेतकऱ्यांना 'शॉक'

धुक्यामुळे द्राक्षपिकांसह शेतकऱ्यांना 'शॉक'

कलेढोण : खटावच्या पूर्व भागातील कलेढोण परिसरात गेल्या आठवड्यापासून पहाटे पडणाऱ्या धुक्‍यामुळे पिकांवरील रोगराईचे प्रमाण वाढले आहे. धुक्यामुळे द्राक्षांसह इतर पिकांच्या कोवळ्या पानावर पाणी साचून राहिल्याने उन्हामुळे पानांना चटके बसल्याने ती करपली जात आहेत. बागेत ओलावा राहिल्याने भुरी वाढल्याने द्राक्षपिकांसह शेतकऱ्यांना जादाच्या खर्चाचा 'शॉक' बसला आहे.

जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षे निर्यातीत अग्रेसर असणाऱ्या कलेढोण भागात सुमारे ६०० एकर क्षेत्रावर द्राक्षांचे पिक घेतले जाते. त्यातून जिल्हासह देशात परकीय चलनाची आयात होते. मात्र परकीय चलन मिळवून देणाऱ्या भागातील शेतकऱ्यासमोर निसर्गाने संकटाची कुऱ्हाड ठेवली आहे. यंदा पावसाळ्यात भागात पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने भागातील भूजल पातळी वाढली नाही. परिणामी उपलब्ध पाणीसाठ्यावर भागातील निम्या बागांची छाटण्या पूर्ण झाल्या आहेत. तर निम्या बागा छाटणीविना उभा आहेत.

छाटणी झालेल्या बागांवर तुरळक पडणाऱ्या पावसाने द्राक्ष वेलीवर लावलेला औषधांचा लेप (पेस्ट) निघून जात आहे. तर कधी पहाटे व सकाळच्या दवामुळे औषधांचा लेप निकामा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा-पुन्हा पेस्ट लावली लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. धुक्यामुळे बागांत पाणी साचून राहत असल्याने भुरी, करप्याचे प्रमाण वाढले आहे. तर इतर पिकांवर तांबेरा पडत आहे. 

दुसरीकडे शेतात भाजीपाल्याचे उत्पन्न घेणाऱ्या कलेढोण, पाचवड, मुळीकवाडी, कान्हरवाडी, गारुडी ,अनफळे आदी. धुक्यामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. अपुरा पाऊस, अवेळी पडणारा पाऊस, धुक्यामुळे शेतकऱ्याना आर्थिक खर्चाचा शॉक बसला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com