द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटात गोळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

■ बदलत्या हवामानाचा परिणाम 
■ बागांवर डावण्या आणि बुरीचा प्रादुर्भाव वाढला 
■ परतीच्या पावसानंतर आणखी एक संकट 
■ डाळिंब, गहू, रब्बी ज्वारी ही पिकेही संकटात

पंढरपूर : आधीच अवकाळी पावसाने मारलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आता ढगाळ हवामानाशी सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने द्राक्षे बागांवर डावण्या आणि बुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे पंढरपूर तालुक्‍यासह सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. 

हेही वाचा : इथं पाणी पण मिळत नाही 

यावर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब या फळ पिकांसह कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अवकाळीचा परिणाम संपत नाही तेच पुन्हा दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. ढगाळ हवामान आणि हवेत गारवा असल्याने द्राक्षांवर डावण्या आणि बुरी रोगाचा हमखास प्रादुर्भाव वाढतो. अशावेळी शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्यासाठी हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. 

हेही वाचा : सोलापूरच्या प्रगती सोलनकरला पराभवाचा धक्का 

आधीचा दुष्काळ, त्यानंतर आलेल्या अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या संकटातून शेतकरी कसे तरी सावरत असतानाच पुन्हा ढगाळ हवामानाचे नवे संकट उभे राहिले आहे. नव्या संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. द्राक्ष पिकांबरोबरच डाळिंबावर कुजवा आणि मर रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे डाळिंब शेतकरीही हैराण झाले आहेत. ढगाळ हवामानामुळे गव्हू पिकांवर तांबेरा पडण्याची तर हरभऱ्यावर घाटी आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. या शिवाय रब्बी ज्वारीवर देखील चिकट्या रोग येण्याची शक्‍यता आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामान तयार झाल्याने द्राक्षासह इतर शेती पिके देखील संकटात आली आहेत. 

हेही वाचा : मोडून पडला संसार... पण मोडला नाही कणा 

अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान 
सततच्या हवामान बदलामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून ढगाळ हवामान तयार झाल्याने पुन्हा द्राक्षांवर डावण्या आणि बुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. 
- विजयसिंह देशमुख, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कासेगाव 

पंढरपूर तालुक्‍यासाठी सहा कोटीचे अनुदान प्राप्त 
मागील महिन्यात पंढरपूर तालुक्‍यात अवकाळी पावसामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पंढरपूर तालुक्‍यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 6 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील ही अनुदानाची रक्कम देखील लवकर शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grapes growers worried