सांगली जिल्ह्याचे द्राक्षउत्पादन हजार कोटींवर

Grapes
Grapes

सांगली - यंदाचा द्राक्षहंगाम शेतकऱ्यांना गोड ठरला नाही. गेल्या वर्षीपेक्षा वीस ते चाळीस टक्के कमी दराने द्राक्षे गेली. निसर्गाच्या साथीने उत्पादन वाढले; पण त्याचे चांगले पैसे होऊ शकले नाहीत.

यंदा पाऊसमान कमी झाले तरी शेतकऱ्यांनी हिमतीवर बागा फुलविल्या. प्रसंगी टॅंकरच्या पाण्याने जगविल्या. फळधारणाही चांगली झाली. दावण्या फिरकला नाही. त्यामुळे उत्पादन वाढण्याची चिन्हे नोव्हेंबरपासूनच दिसत होती. तसे झालेही; पण बाजारपेठेत मागणी लवकर आलीच नाही. थंडीने मार्चपर्यंत मुक्काम ठोकला. त्यामुळे दक्षिणेतून व्यापारी फिरकले नाहीत. तयार माल बागेतच थांबवावा लागला. महाशिवरात्रीनंतर उष्णतामान वाढले, तशी मागणी वाढली. सुरवातीला चार किलोची पेटी सरासरी २५० रुपयांना विकली गेली. नंतर मात्र १५० रुपयांपर्यंत घसरण झाली.  

दराअभावी शेतकरी बेदाण्याकडे वळले. निर्यातीलाही वातावरण प्रतिकूल राहिले. युरोप, रशियाला गेलेले कंटेनर तेथील आयातदारांनी रासायनिक अंशाचे कारण देत लवकर स्वीकारले नाहीत. फक्त २० हजार टन द्राक्षे परदेशात गेली. सरासरी ८० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. गेल्या वर्षीपेक्षा तो १५ ते २० टक्‍क्‍यांनी कमी आहे.     

एकरी उतारा सरासरी १४ टन राहिला. एकट्या मिरज तालुक्‍यानेच ३५० कोटींहून अधिक कमावले. जिल्ह्याचे उत्पादन हजार कोटींवर जाण्याची अपेक्षा आहे. 

सोनी-भोसेची यंदाही बाजी
सोनी आणि भोसे परिसरातील द्राक्ष शेतकऱ्यांनी यंदाही उत्पादन आणि दरात बाजी मारली. त्यांची द्राक्षे मुंबई बाजारात चढाओढीने विकली गेली. गुणवत्ता, द्राक्षांचे आकारमान, आकर्षकता, आक्रमक मार्केटिंग याच्या जोरावर शेतकरी मुंबई बाजारात अग्रेसर राहिले.

‘युरोपीय देश आणि आखातात यंदा वीस हजार टन द्राक्षे गेली. तेथील निकषांची काटेकोर पूर्तता करण्यात शेतकरी यशस्वी ठरले. बेदाण्यासाठी सुमारे ३० हजार एकर क्षेत्रातील द्राक्षांचा वापर झाला. उत्पादन चांगले झाले तरी दर तुलनेने कमी राहिला.’
- चंद्रकांत लांडगे, विभागीय अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ 

‘आरफळ, टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी या पाणीयोजना पूर्ण क्षमतेने संपूर्ण हंगामात सुरू राहिल्या असत्या तर उत्पादन आणखी वाढले असते. शेतकऱ्यांनी प्रसंगी टॅंकरने पाणी आणून उत्पादनवाढीची शिकस्त केली. गुणवत्ता असल्याने आणखी चांगल्या दराची अपेक्षा होती’
- विनायक पाटील, द्राक्ष शेतकरी, सावळज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com