द्राक्ष हंगामाची अपेक्षित उलाढाल ३५० कोटींवर

द्राक्ष हंगामाची अपेक्षित उलाढाल ३५० कोटींवर

मालगाव, कवलापूर, बेडग आघाडीवर; दोन वर्षांत तालुक्‍यातील क्षेत्रात ९५० हेक्‍टरने वाढ  

मिरज - मिरज तालुक्‍यात यंदाच्या द्राक्ष हंगामात साडेतीनशे कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. हंगामाला सुरवात झाली असून द्राक्षाला चांगला दर मिळू लागला आहे. ९० टक्‍क्‍यांहून अधिक द्राक्षे बेदाण्यासाठी वापरण्यात येतात; उर्वरित द्राक्षे विक्रीसाठी किंवा वायनरीसाठी वापरली जातात. बेदाणा उत्पादनात जिल्ह्याने देशात आघाडी मिळवली आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून निसर्गाने द्राक्षशेतीला चांगली साथ दिली आहे. त्यामुळे दोन वर्षांत तालुक्‍यातील द्राक्ष क्षेत्र ९५० हेक्‍टरने वाढले आहे. याचे श्रेय म्हैसाळ योजनेलाही द्यावे लागेल. २०१४ मध्ये ७२ गावांत ५ हजार ३९७ हेक्‍टर क्षेत्रांत द्राक्ष बागायत होती; यंदा ६ हजार ३३१ हेक्‍टर शेतीवर द्राक्षे फुलली आहेत. शेतकऱ्यांची संख्या १४ हजार ९२७ वरून १६ हजारांवर गेली आहे. यातील सर्वाधिक म्हणजे १३०० हेक्‍टर द्राक्ष बागायत एकट्या मालगावमध्ये आहे. तेथील २ हजार ४०० शेतकरी द्राक्षाचे उत्पादन घेतात.

त्याखालोखाल बेडगमध्ये १ हजार ८०० शेतकरी ७५० हेक्‍टरवर द्राक्ष बागायत करतात. तिसरा क्रमांक कवलापूरचा असून तेथील १ हजार २०० शेतकऱ्यांनी ४५० हेक्‍टरमध्ये द्राक्षे फुलवली आहेत.  

द्राक्षासाठी अग्रेसर असणाऱ्या अन्य गावांमध्ये म्हैसाळ (३१० हेक्‍टर), टाकळी (२९० हेक्‍टर), खंडेराजुरी (२६० हेक्‍टर), नरवाड (२४० हेक्‍टर), मिरज (२२० हेक्‍टर), वड्डी (२०० हेक्‍टर), एरंडोली (१९० हेक्‍टर), सोनी (१८० हेक्‍टर), मल्लेवाडी (१६० हेक्‍टर), बेळंकी (१४० हेक्‍टर), आरग (१५० हेक्‍टर), भोसे (१४० हेक्‍टर), बोलवाड (१५० हेक्‍टर) यांचा समावेश आहे. यातील बहुतांशी गावे पाणीटंचाईला तोड देणारी आहेत. तरीही शेतकऱ्यांनी जिद्दीने बागा फुलवल्या आहेत. 

द्राक्षांना मिळणाऱ्या बेभरवशाच्या दरामुळे शेतकरी बेदाणा निर्मितीवर भर देत आहेत. यंदा १ लाख ४२ हजार टन द्राक्ष उत्पादनाचा कृषी विभागाचा अंदाज आहे. थेट विक्री आणि बेदाणा निर्मितीद्वारे यंदा ३५० कोटी रुपयांच्या उलाढालीची अपेक्षा आहे. द्राक्षशेतीतील रोजगार, औषधे, बेदाणानिर्मितीद्वारे उपलब्ध झालेला रोजगार, वाहतूक आणि व्यापार यामुळे झालेली उलाढाल वेगळीच असेल. 

दृष्टिक्षेपात
एकूण क्षेत्र - ६ हजार ३३१ हेक्‍टर
शेतकरी - १६ हजार
एकूण द्राक्ष उत्पादन - १ लाख ४२ हजार टन उत्पादनाचा अंदाज
एकूण अपेक्षित उलाढाल - ३५० कोटी रुपये
 

मालगावची उलाढाल 
तालुक्‍यातील सर्वाधिक बागायत क्षेत्र मालगावमध्ये आहे. 
द्राक्षक्षेत्र - १३०० हेक्‍टर
अपेक्षित उत्पादन - २९ हजार टन
द्राक्ष व बेदाणा उलाढाल - ७५ कोटी रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com