हिरवे हिरवे गार गालिचे...

सुनील गर्जे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

2014मध्ये प्रशांत पाटील गडाख यांनी मोरया चिंचोरे गाव विकासासाठी दत्तक घेतले. रस्ते, पाणी, आरोग्य, शैक्षणिक अशा सर्वच सुविधांची दयनीय अवस्था होती. तेथील राजकीय वाद विकोपाला गेला होता. अशा स्थितीत गावाचा कायापालट करणे सोपे नव्हते.

नेवासे (नगर ): नैसर्गिक व भौगोलिक स्थिती अनुकूल असूनही कायम दुष्काळी व उजाड माळरान म्हणून ओळख असलेल्या मोरया चिंचोरे (ता. नेवासे) गावासह परिसर सध्या हिरवाईने नटला आहे. युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाने हे गाव दत्तक घेतल्यानंतर तेथे हा कायापालट झाला आहे. "यशवंत'च्या माध्यमातून झालेल्या जलसंधारणाच्या कामाला यश आले. येथील पठार भागासह डोंगरकुशीत असलेले तलाव, बांध-बंधारे सध्या तुडुंब भरले आहेत. 

2014मध्ये प्रशांत पाटील गडाख यांनी मोरया चिंचोरे गाव विकासासाठी दत्तक घेतले. रस्ते, पाणी, आरोग्य, शैक्षणिक अशा सर्वच सुविधांची दयनीय अवस्था होती. तेथील राजकीय वाद विकोपाला गेला होता. अशा स्थितीत गावाचा कायापालट करणे सोपे नव्हते. युवा नेते गडाख यांनी अवघ्या पाच-सहा वर्षांच्या काळात जलसंधारण, बीजारोपण, वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गावाचा व परिसराचा चेहरामोहराच बदलला. "तरुणाई समाजासाठी' हे ब्रीद घेऊन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाच्या माध्यमातून युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांनी प्रथम या गावाचा विकास आराखडा तयार केला. हा परिसर दुष्काळनिर्मूलन करण्यासाठी विविध योजनांतून गावात संपूर्ण नदीपात्रात तेरा साखळी सिमेंट बंधारे बांधले. 

हेही वाचा ः"त्या' ग्रामपंचायतींच्याही निधीला कात्री

गावाच्या दक्षिणेच्या डोंगराचे वाहून जाणारे पाणी डोंगरमाथा ते पायथा या योजनेंतर्गत सलग समतल चर बांधून जिरवले. आदर्श गाव योजनेअंतर्गत सन 2017-18 या वर्षात गावात एकूण एक हजार हेक्‍टर क्षेत्रावर बांधबंदिस्ती, समतल चर, वनराई क्षेत्रात बांधबंदिस्ती, तसेच ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारे बांधले. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे मोरया चिंचोरे गावातील एक हजार हेक्‍टर क्षेत्रावर पाणी साठल्यामुळे गावात जलसंधारणाची वॉटर बॅंक निर्माण झाली आहे. 

हेही वाचा ःरेल्वेस्थानकात निर्जळी

"यशवंत'च्या जलसंधारण कामांमुळे भरपावसाळ्यातही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या मोरया चिंचोरे ग्रामस्थांचा पाणीप्रश्न कायमचा मिटला आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून कोरड्या ठाक असलेल्या विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

एक लाख बीजारोपण 

प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचे देवराई-ट्री-स्टोरी फाउंडेशन व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानातर्फे मोरया चिंचोरे परिसरातील वनक्षेत्र परिसरात साठ प्रकारच्या देशी वनस्पतींचे एक लाख बीजारोपण करण्यात आले. 2019-20मध्ये या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. 

विकासकामे केल्याचे समाधान 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्या सहकार्याने 
मोरया चिंचोरे येथे कामे केली. परिसरात झालेले रस्ते, पाणी, आरोग्य, शैक्षणिक सुविधा, तसेच जलसंधारण, बीजारोपण, वृक्षारोपणासह विविध विकासकामे केल्याचे समाधान आहे. 
- प्रशांत पाटील गडाख, 
अध्यक्ष, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Green Green Carpet Carpet ...