बेळगावात हुतात्म्यांना आज अभिवादन: सीमाभागात कडकडीत हरताळ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

हुतात्म्यांना आज अभिवादन
 हुतात्मा चौक व कंग्राळी खुर्द येथे कार्यक्रम

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती व विविध मराठी संघटनांकडून रविवारी (ता. १७) सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता हुतात्मा चौकात शहर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. तर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कंग्राळी खुर्द येथे सकाळी साडेनऊला हुतात्म्यांना अभिवादन केले जाईल. प्रत्येकाने आपापले व्यवहार बंद ठेवून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे. खानापूर व निपाणी येथेही हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे.

१६ जानेवारी १९५६ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राज्य पुनर्रचना मंडळाचा अहवाल स्वीकारणार असल्याचे रेडिओवरून जाहीर केले. त्यामुळे बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागावर अन्याय झाला. मराठीभाषकांनी या अन्यायाविरोधात संताप व्यक्‍त करून आंदोलन हाती घेतले. १७ जानेवारीला बेळगावात झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी निर्दयीपणे गोळीबार केला. आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात मारुती बेन्नाळकर, मधू बांदेकर, लक्ष्मण गावडे, महादेव बारागडी; तर निपाणीत कमळाबाई मोहिते असे पाच जण हुतात्मे झाले. तर सत्याग्रही नागाप्पा होसूरकर, बाळू निलजकर, गोपाळ अप्पू चौगुले यांचा तुरुंगात मृत्यू झाला. तेव्हापासून या हुतात्म्यांना दरवर्षी अभिवादन करण्यात येते. यानिमित्त सीमाभागात कडकडीत हरताळ पाळण्यात येतो.

हेही वाचा- कासव संवर्धन; किनाऱ्यावर मिळाले पहिले घरटे  -

शहरसह तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना, महिला आघाडी व इतर मराठी संघटनांनी हुतात्मादिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच विभागवार समितीतर्फे बैठका घेऊन हुतात्म्यांना अभिवादन करत पुन्हा एकदा मराठी निष्ठा दाखवून द्यावी, असे मत मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्‍त केले आहे. 
हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आल्यानंतर रामदेव गल्ली, संयुक्‍त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोडवरून फेरी काढली जाणार आहे.

अभिवादन 
कुठे व कधी? 
 हुतात्मा चौक : 
सकाळी ९ 
 कंग्राळी खुर्द : 
सकाळी ९.३०
 खानापूर : 
सकाळी ९
 निपाणी : 
सकाळी १०.३०

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Greetings to the martyrs in Belgaum