तांबड्या मातीतील पसरी शेंगेला शहरी भागातून मागणी

विलास माने
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मल्हारपेठ - गरिबांचा बदाम समजल्या जाणाऱ्या पसरी भुईमुगाच्या काढणीला डोंगरकपारीतील वाड्यावस्त्यांवर वेग आला आहे. ही शेंग बहरात असतानाच पावसाने ओढ दिल्यामुळे त्याच्या उत्पादन वाढीवर परिणाम झाला आहे. परंतु, पाटण तालुक्‍यातील तांबड्या मातीमध्ये पिकत असलेल्या या शेंगेला पुण्या-मुंबईसह शहरी भागातील चोखंदळ ग्राहकांची मागणी वाढत आहे.

पाटण तालुक्‍याच्या डोंगराळ भागातील दिवशी, बेलवडे, डावरी, ठोमसे, गणेवाडी, साखरी, बिबी, केरळ, आंबावणे, चाफळ भागातील दाढोली, पाडोळशी कोळेकरवाडी, डेरवण, ढेबेवाडी विभागातील बहुतांशी भागातील पसरी शेंगेला शहरातील बाजारपेठेत चांगली मागणी आहे. पसरी शेंगेला गरिबाचा बदाम संबोधले जाते. शहरी भागात या शेंगदाण्याला चांगली मागणी आहे. या शेंगेला ६० ते ७० रुपये किलो भाव मिळत आहे. बाजारात मध्यप्रदेश व इतर राज्यांतून शेंगदाणा विक्रीस येतो. त्याचा दर जवळपास १०० ते १२० रुपये किलो पडतो तर जेएल २४, वेस्टर्न, धनलक्ष्मी, ट्रॉम्बे टिएजी २४ या संकरित वाणाची बागायती पट्टयात उन्हाळीसाठी लागवड केली जाते. मात्र, या सर्वांत पारंपरिक पसरी शेंगेची चवच न्यारी असल्याने शहरी भागातील चोखंदळ ग्राहकांची मागणी वाढली आहे.

पसरी शेंग ही बैलकुळवाच्या साह्याने काढून त्या मातीतून चाळून काढल्या जातात. साधारण सहा महिन्याचे पीक असल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याची काढणी केली जाते. तर जेएल २४, वेस्टर्न, धनलक्ष्मी, ट्रॉम्बे या जातीही बाजारात उपलब्ध झाल्या असल्या तरी पसरी शेंगेला बाजारात चांगली मागणी आहे. किलोला ६० ते ७० रुपये इतका भाव असतो. परंतु, यावेळी पावसाने ओढ दिल्यामुळे उत्पादनाला फटका बसला आहे.

गेल्या चार-पाच वर्षांपासून पसरी शेंगेला शहरी भागातील ग्राहकांची चांगली मागणी आहे. माझ्याकडून डॉक्‍टर, प्रशासकीय अधिकारी शेंग खरेदी करतात. मध्यंतरी आरा टोचण्याच्या वेळी पावसाने ओढ दिल्यामुळे उत्पादन घटले.
- बजरंग काटकर,  शेतकरी, ठोमसे

Web Title: Groundnut Demand in City Area