सायकलप्रेमी गटशिक्षणाधिकारी

सायकलप्रेमी गटशिक्षणाधिकारी

मुरगूड - वेळ सकाळी दहाची. सुटा-बुटातील एक गृहस्थ डोक्‍यावर कॅप घालून मुरगूडच्या दिशेने सायकलवरून जात होते. कुरुकली- मुरगूड प्रवासादरम्यान सुरुपली नजीक ते दिसले. निश्‍चतच या गोष्टीचे मला अप्रूप वाटले. निरखून पाहिले तर ते होते कागलचे गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर.

सरकारी अधिकारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती एखादी सरकारी गाडी किंवा चकचकीत चारचाकी; पण हे दृश्‍य तर वेगळेच होते. मी मोटरसायकलवरुन प्रवास करत होतो. त्यांना बघून गाडी थांबवली तेही थांबले. नमस्कार, औपचारिकता पार पडताच मी त्यांना प्रश्न केला.

कमळकर साहेब काय विशेष आज सायकलवरून..? तर क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले, हो मी महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सायकलने फिरतो. रविवारी सुट्टीच्या दिवशी ३२ ते ४० किलोमीटर सायकलींग करतो. वर्षभरापासून दिनक्रम सुरू आहे. सायकल चालवणे आरोग्यासाठी चांगले आहे. मुरगूड तसेच इतर ठिकाणी शक्‍यतो सायकलने जातो. गावात इतरत्र फिरताना मोटरसायकलचा वापर न करता सायकलचा वापर करतो.

परिसरातील शाळा भेटी देखील सायकलने करतो. सायकलमुळे चांगला व्यायाम होतोच शिवाय इंधन बचत होते. पर्यावरणाचे रक्षण होते. मग आज सुट्टी का..? मी विचारताच ते म्हणाले नाही. आज यमगे केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांची मिटींग बोलावली आहे. त्या मिटिंगला चाललो आहे. आजच्या इंटरनेट  युगात  पर्यावरणाचे भान ठेवून एक अधिकारी सरकारी मिटींगसाठी सायकलवरून जातानाचे दृश्‍य निश्‍चितपणे प्रेरणादायी होते. 

सायकल वापरा..! 
कागल तालुक्‍यात प्राथमिक विभागात सध्या ६४५ शिक्षक कार्यरत आहेत. यात जवळपास २०० महिला शिक्षक कार्यरत आहेत. त्यांना वगळून लांबच्या अंतरावरून शाळेला ये-जा करणारे किमान ३०० शिक्षक आहेत. उर्वरित जे शाळेपासून १० कि.मी.च्या परिसरात राहतात, त्यांनी सायकलचा वापर केल्यास आरोग्य चांगले राहील. तसेच, इंधनबचत होईल व पर्यावरण संरक्षण होईल. त्यांनाही सायकल वापरण्याचे आवाहन करणार असल्याचे कमळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com